उन्हाचा तडाखा ओसरला; उकाडा कायम
By admin | Published: April 4, 2017 05:39 AM2017-04-04T05:39:25+5:302017-04-04T05:39:25+5:30
गुजरातमध्ये निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली
मुंबई : गुजरातमध्ये निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली होती. राज्यातल्या प्रमुख शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत होते. तर मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंदवण्यात येत होते. परिणामी, मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. मात्र, आता वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईचे कमाल तापमान ३८ हून ३४ आणि ३४ हून ३२ अंशांवर घसरल्याने उन्हाचा तडाखा कमी झाला, परंतु उकाडा कायम आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंद झाले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यात, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मागील आठवड्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंद झाले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान ३४ अंशांवर घसरले. परिणामी उन्हाचा तडाखा कमी तर उकाड्यात वाढ झाली. सद्य:स्थितीत मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशांच्या आसपास आहे. उन्हाचा तडाखा काही अंशी कमी झाला असून, उकाडा कायम आहे. मंगळवारसह बुधवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. (प्रतिनिधी)