पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
By Admin | Published: July 4, 2016 04:52 AM2016-07-04T04:52:16+5:302016-07-04T04:52:16+5:30
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक गेल्या १० दिवसांत कोलमडले.
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक गेल्या १० दिवसांत कोलमडले. दोन विविध घटनांमध्येच ३00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या; तर याच १० दिवसांत लोकल उशिराने धावण्याचे प्रमाण हे १०-१५ मिनिटे राहिल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
लोकलमध्ये बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नलमध्ये बिघाड होणे इत्यादी कारणांमुळे लोकल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. तसेच तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी देखभाल-दुरुस्तीवरही विशेष लक्ष देण्यास सांगितले होते. तरीही मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर वारंवार बिघाड होत आहेत. २१ जूनला पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर लोकलचा खोळंबा झाला. लोकल उशिराने धावत असल्याने दिवा येथे प्रवाशांकडून आंदोलन करण्यात आले आणि त्याचवेळी दिवा पारसिक बोगद्यात समस्या उद्भवल्याने ब्लॉक घेऊन ती समस्या सोडवण्यात आली. या सर्व गोंधळामुळे तब्बल २५३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. २३ जून आणि २८ जूनला सीएसटीला जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेवरील सेवा विस्कळीत होतानाच अनेक लोकल फेऱ्यांना लेट मार्क लागला. २९ जून रोजी ऐरोलीजवळ फिडर तुटल्याने ठाणे ते वाशी लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला आणि जवळपास ५४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या दोन घटनांमुळे २00पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना लेट मार्कही लागला.
>मध्य रेल्वेवर घडलेल्या महत्त्वाच्या घटना
२१ जून - मेन लाइनवर तीन घटनांमुळे २५३ लोकल फेऱ्या रद्द.
२३ जून - सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये बिघाड. दादर स्थानकातील घटना.
२८ जून - अंबरनाथहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये तांत्रिक बिघाड.
२९ जून - ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प, ५४ फेऱ्या रद्द.