इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; २० नोव्हेंबरपासून होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 07:29 PM2020-10-20T19:29:26+5:302020-10-20T19:30:03+5:30
दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत तर बारावीची १० डिसेंबरपर्यंत चालणार
पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. २०) जाहीर केले. त्यानुसार लेखी परीक्षा दि २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा ५ डिसेंबरपर्यंत तर बारावीची १० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
राज्य मंडळाकडून सोमवारी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मंगळवारपासून या परीक्षांचे अर्ज भरण्यासही सुरूवात झाली आहे. आता मंडळाने या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत दहावीची तर दि. २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान बारावी व द्विलक्षी अभ्यासक्रमाची परीक्षा होईल. इयत्ता बारावी व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा दि. २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरण्यान घेतली जाणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान होईल. बारावीच्या या परीक्षा दि. १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
दरम्यान, संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी शाळा व महाविद्यालयांना विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्यानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करावी. अन्य माध्यमातून आलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.
-----------
लेखी परीक्षेच्या सविस्तर वेळापत्रकासाठी : www.mahahsscboard.in
----------
परीक्षांचे वेळापत्रक :
इयत्ता दहावी - दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर
इयत्ता बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) - दि. २० नोव्हेबंर ते १० डिसेंबर
इयत्ता बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) - दि. २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर
------------