अनुसूचित जातीत अजूनही होतात बालविवाह
By admin | Published: January 22, 2016 03:26 AM2016-01-22T03:26:22+5:302016-01-22T03:26:22+5:30
पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही.
मुंबई : पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीने स्वत:चा बालविवाह रोखण्याची घटना नुकतीच उघडकीस झाली असली तरी महाराष्ट्रात अजूनही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात अनुसूचित जातींमध्ये अल्पवयात विवाह करण्याचे प्रमाण आजही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे.
२०११च्या जनगणनेनुसार, १० ते १४ या गटातील १३ लाख ३१ हजार ९३० मुलांपैकी ४१, ४५२ मुलांचे याच वयात विवाह झाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या बालविवाहांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असून, २३,७५६ मुलींचा १४ वर्षे वयापर्यंत विवाह झालेला आढळून आला आहे. इतकेच नव्हे तर यातील १३८९ मुलींना याच वयामध्ये दुर्दैवाने वैधव्य आल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच १० ते १४ या वयोगटातील विवाह होणाऱ्यांपैकी १३३३ लोक विभक्त झाले आहेत, तर २७६ जणांचा घटस्फोट झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मुलींना निरक्षर ठेवणे, मग मुलींचे अल्पवयात लग्न करून देणे आणि नंतर त्यांचा अल्पवयातील मृत्यू हे एक दुष्टचक्रच आहे. मुलींचा अल्पवयात विवाह झाल्यावर त्या स्वत:ची काळजी घेण्यासही सक्षम नसतात. अशा स्थितीत त्यांना गर्भधारणेला सामोरे जावे लागते, तसेच घरातील कामे, शेतीची कामेही त्यांच्या अंगावर पडतात. अपुरे पोषण झालेल्या मुलींचा प्रसूतीच्या वेळेस मृत्यू होण्याची शक्यता वाढते आणि त्यांची मुलेही कुपोषित जन्मतात. त्यामुळे सामाजिक कारणांनी तयार होणारे हे दुष्टचक्र भेदले पाहिजे.
- वंदना खरे, सामाजिक कार्यकर्त्या
अनुसूचित जातींमधील लोकसंख्येपैकी १० ते १४ या वयोगटामध्ये झालेल्या ४१, ४५२ विवाहांपैकी २३,३१२ विवाह ग्रामीण भागात झालेले आहेत.
त्यामध्ये ८०० मुलींना आपले अहेवपण गमवावे लागले असून, ८३७ जणांनी विभक्त होण्याचा आणि १६६ जणांनी घटस्फोट घेतलेला आहे.
ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे कमी प्रमाण, रूढी-प्रथांमुळे बालविवाहांची संख्या तेथे जास्त असल्याचे दिसून येते.
आर्थिक दुर्बलतेमुळे व न परवडणाऱ्या आरोग्यसेवांमुळे या वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
यामुळेच वयाच्या १४ वर्षांपर्यंत ग्रामीण भागातील १२९९ विवाहितांना आपल्या जीवनसाथीचा मृत्यू पाहावा लागला आहे.