स्कॉलर कॉलेजकुमार बनला चोरटा
By admin | Published: April 23, 2016 03:58 AM2016-04-23T03:58:41+5:302016-04-23T03:58:41+5:30
चैनी, सुखासीन जगण्याची सवय व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला
कोल्हापूर : चैनी, सुखासीन जगण्याची सवय व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला. अवधूत ईश्वरा पाटील (वय १९ रा. देऊळवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून दहा घरफोड्यांतील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप व दोन दुचाकी असा तब्बल ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘एक विद्यार्थी दर आठवड्याला वेगवेगळे महागडे मोबाईल वापरत असून त्याच्याकडे दोन महागड्या दुचाकी आहेत. तो आठवड्याला सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च करतो,’ अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत संशयित अवधूत ईश्वरा पाटील (वय १९) याला बुधवारी (दि. १९) पकडले. त्याने गोवा येथे चोरलेल्या पाकिटातील कृष्णात सीताराम बाचणकर यांचा वाहन परवाना देऊन दुचाकी भाड्याने घेऊन ती चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सावंतवाडी येथून एक मोपेड त्याने चोरली न्यायालयाने त्याला सोमवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिक्षा व्हावी;
पालकांची भावना
अवधूत हा महाविद्यालयात वेगवेगळे महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे वापरत असल्यामुळे महाविद्यालयामधील मित्र-मैत्रिणी त्याचे कौतुक करत असत. चोरीच्या पैशांतून तो मित्रांना पार्टी देत होता. त्याचबरोबर देऊळवाडी गावाकडे तो दुचाकी घेऊन जात असे. घरच्यांनी विचारले तर ही मित्राची दुचाकी आहे, असे तो सांगत असे. चोरीच्या प्रकाराबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील कुटुंबीयांचे मत असल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
परीक्षेस बसू देणार
अवधूतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. त्याची गुणवत्ता पाहता त्याला एक मे रोजी होणाऱ्या सीईटीच्या परीक्षेला बसू दिले जाईल. त्याला घडलेल्या कृत्याबाबत पश्चाताप होत आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही.त्याला यातून सुधारण्याची संधी देवू.
- प्रदीप देशपांडे,
पोलिस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा