शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता बदलली
By admin | Published: June 26, 2015 03:04 AM2015-06-26T03:04:21+5:302015-06-26T03:04:21+5:30
शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीआय) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या इयत्तेत बदल करण्यात आला आहे.
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीआय) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या इयत्तेत बदल करण्यात आला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथीऐवजी ५ वी तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ७ वी ऐवजी ८ वी मध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शालान्त स्तरावरील गट बदलण्यात आले आहेत. या नव्या बदलानुसार आता इ. १ ली ते पाचवीपर्यंत प्राथमिक, इयत्ता ६ वी ते ८वीपर्यंत उच्च प्राथमिक, तर इयत्ता ९ वी ते १० वी माध्यमिक अशी तीन गटांत शालान्त शिक्षणाची विभागणी करण्यात आली आहे. या बदलामुळे शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेतही बदल करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला असून यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच या परीक्षा पद्धतीत व अभ्यासक्रमात काही बदल होणे गरजेचे आहे, असे अनेक शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार परीक्षाविषयक मार्गदर्शन या डिसेंबर २०१५ पर्यंत करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)