आंदोलनाच्या धसक्याने स्कूल बॅग झाली हलकी
By admin | Published: August 25, 2016 08:06 PM2016-08-25T20:06:05+5:302016-08-25T20:06:05+5:30
२ आॅगस्ट रोजी प्रथमच विद्या निकेतनमधील सातवीतील दोन विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत आपली व्यथा मांडली.
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 25 : २२ आॅगस्ट रोजी प्रथमच विद्या निकेतनमधील सातवीतील दोन विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत आपली व्यथा मांडली. दिवसेंदिवस जड होत चाललेले पाठीवरचे स्कूल बॅगचे ओझे कसे आरोग्याशी खेळत आहेत, हे शिक्षण व्यवस्थेला व शाळा व्यवस्थापनाला पटवून देण्यासाठी या चिमुकल्यांना हा खटाटोप करावा लागला. सात-आठ किलोचे स्कूल बॅगचे ओझे हलके करा, असा टाहो फोडत प्रसंगी यासाठी आंदोलनाची तयारीही या विद्यार्थ्यांनी दर्शविली. याची दखल घेत विद्या निकेतनच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी लॉकरची व्यवस्था केली. यातून आपली स्कूलबॅग तर हलकी झालीू; मात्र इतर शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न ऋग्वेद राईकवार याने आज गुरुवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला आहे. इतर विद्यार्थ्यांच्याही स्कूल बॅग हलक्या होईपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहणार, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकून राहण्यासाठी आजचा विद्यार्थी चांगलाच व्यस्त झाला आहे. प्रत्येक पातळीवर स्पर्धा निर्माण झाली आहे. यातून विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे ओझे वाढत असून ते आता विद्यार्थ्यांना पेलवत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगचा प्रश्न सर्व स्तरावर चर्चिला जात आहे़ शिक्षण मंत्रालयानेही विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगच्या वजनाची दखल घेत स्कूल बॅगचे वजन कमी करण्यासाठी शाळांना दिशानिर्देश दिले़ त्यासाठी काही उपाययोजना करण्याचेही सूचविले आहे़ असे असतानाही विद्यार्थ्यांच्या पाठीवर जड स्कूलबॅगचे ओझे शाळा व्यवस्थापनाकडून लादले जात आहे़
२२ आॅगस्ट रोजी विद्या निकेतन स्कूलमधील सातवीतील ऋग्वेद राईकवार व परितोष भांडेकर या दोन विद्यार्थ्यांनी चंद्रपुरात पत्रपरिषद घेऊन स्कूल बॅगचे ओझे कसे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत, ही बाब अतिशय ताकदीने मांडली. स्कूल बॅगचे ओझे ७ ते ८ किलोचे असते़ दुसऱ्या माळ्यावर ते पाठीवर न्यावे लागते़ त्यामुळे पाठीचे दुखणे आणि खांद्याला त्रास होतो़ बॅगच्या वजनाकडे लक्ष वेधण्यासाठी प्राचार्यांना दोनदा पत्र दिले़ परंतु, प्राचार्यानी लक्ष दिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. याबाबत वृत्त प्रकाशित होताच विद्या निकेतन स्कूलचे व्यवस्थापन जागे झाले. त्यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी लॉकरची व्यवस्था केली. मात्र इतर शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्कूल बॅग अजूनही वजनीच आहेत. सर्वच विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग हलक्या व्हायला हव्यात, या मागणीसाठी पुन्हा ऋग्वेद राईकवार प्रसारमाध्यमापुढे आला.
माझी स्कूल बॅग हलकी झाली आहे. मात्र इतर शाळांमधील माझ्या हजारो विद्यार्थीमित्रांच्या बॅग अजूनही जडच आहे. त्यांच्या शाळा व्यवस्थापनाची मनमानी सुरू आहे. त्यामुळे आता सर्वच विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग हलक्या होईपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहणार, असा निर्धार ऋग्वेदने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला;मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊ शकली नाही. शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी ना. तावडे घरी गेल्याचे सांगितले तर पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले. त्यामुळे बोलणे होऊ शकले नाही, अशी माहितीही ऋग्वेद राईकवार यांनी दिली.
उपोषणालाही बसणार
चार महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्कूल बॅगवरील ओझा कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. आता तरी या आश्वासनाची पूर्तता होणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे स्कूल बॅग हलक्या करण्यासाठी प्रसंगी आपण उपोषणाही बसू, असा इशाराही ऋग्वेदने पत्रकार परिषदेत दिला.