शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:39 AM2021-01-28T02:39:04+5:302021-01-28T07:17:46+5:30
एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे
मुंबई : कोरोना महामारीमुळे गेले दहा महिने बंद असलेल्या राज्यातील शाळा बुधवारपासून उघडल्या असून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने शाळेच्या प्रांगणात पुन्हा किलबिलाट ऐकू येऊ लागला. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरी शाळाशाळांमध्ये गुलाबपुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत झाले. मात्र मुंबईच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कधी सुरू हाेणार, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायमच आहे.
हमीपत्र दिलेल्या विद्यार्थ्यांची थर्मल गनने तपासणी करून त्यांना वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. दोन सत्रांमध्ये वर्ग भरवले गेले. विद्यार्थ्यांच्या तुकडीनुसार एक दिवसआड त्यांचे वर्ग भरविण्याचे नियोजन आहे. सकाळी अकरा ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत बहुतांश शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरले. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत दोन ते तीन तुकड्या करण्यात आल्या आहेत.
एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी नववी ते बारावीच्या वर्गासाठी ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या त्याच लागू असणार असल्याचे आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशांप्रमाणे त्यांच्या पुढील सूचना येईपर्यंत मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याने या शाळा कधी सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांकडून हाेत आहे.
विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा
२३ नोव्हेंबरपासून राज्यात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत, ही समाधानाची बाब आहे. पालक व शाळा यांमधील समन्वयामुळे हे शक्य झाले असून सगळीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. येत्या काळात नववी ते बारावीप्रमाणे पाचवी ते आठवीमधील विद्यार्थीसंख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे. - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री