स्कूल बसचालकांचा संप मागे
By Admin | Published: April 10, 2017 04:31 AM2017-04-10T04:31:58+5:302017-04-10T04:31:58+5:30
स्कूल बस चालकांनी वाढवलेले शुल्क आणि त्यातच एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या संपामुळे पालक अधिकच त्रस्त झाले
मुंबई: स्कूल बस चालकांनी वाढवलेले शुल्क आणि त्यातच एप्रिलमध्ये करण्यात येणाऱ्या संपामुळे पालक अधिकच त्रस्त झाले होते, पण आता संप मागे घेतल्यामुळे पालकांची चिंता मिटलेली असून, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने विम्याची रक्कम वाढवल्याचा फटका अन्य वाहनमालकांसह स्कूल बस चालकांनाही बसणार आहे. विम्याच्या हफ्त्यात होणाऱ्या वाढीचा आर्थिक फटक्यामुळे बस मालक त्रस्त झाले होते. त्यामुळे हफ्त्याची रक्कम कमी करा, अन्यथा संपावर जाऊ, अशी मागणी बस मालकांकडून करण्यात आली होती. या संदर्भात झालेल्या बैठकीत इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (आयआरडीए) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र ट्रक टँकर बस वाहतूक महासंघाचे पदाधिकारी आणि स्कूल बसचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आयआरडीएच्या अधिकाऱ्यांनी विम्याच्या हफ्त्यात केल्या जाणाऱ्या वाढीवर पुनर्विचार केला जाणार असल्याचे आश्वासन दिले. काही दिवसांतच यावर उपाय काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे संप करण्याचे काही काळासाठी मागे घेण्यात आल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. या वर्षी पेट्रोल, डिझेलचे भाव दरवर्षी वाढत आहेत. पार्किंगचा खर्च वाढला आहे. त्यातच स्कूल बसच्या सुरक्षेच्या नियमांमुळे खर्च वाढला आहे. त्यातच विम्याच्या हफ्त्याचा बोजा पडणार असल्यामुळे मालक नाराज होते, पण यावर तोडगा निघणार असल्यामुळे मालकांनी तूर्तास संप मागे घेतल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)