स्पर्धा परीक्षांची भरणार ‘शाळा’
By admin | Published: October 5, 2016 06:34 PM2016-10-05T18:34:10+5:302016-10-05T18:34:10+5:30
भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.05 - भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तोंडओळख करून देण्यासाठी शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने उपाय सुचविण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केले होती. या समितीने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रामुख्याने दहावीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिका-यांमार्फत किमान दोन दिवसांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, खासजगी संस्थांना अशी शिबीरे घेण्यास प्रोत्साहन देणे, करिअर मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना सहभागी करून घेणे, नागरी सेवेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अशा विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांची माहिती पाठ्यपुस्तकातमध्ये उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. सर्वोच्च प्रशासकीय पदांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळणे, समाजोपयोगी कामाचे अधिकार मिळणे, त्यातून समाजाचा विकास साधणे या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी इंटरनेटवरील माहिती व वृत्तपत्रांचे वाचन वाढविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे.