शाळा वन खात्याच्या लालफितीत
By admin | Published: March 16, 2015 02:51 AM2015-03-16T02:51:42+5:302015-03-16T02:51:42+5:30
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील मुलामुलींसाठी पालघर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाची चार मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल बांधण्यास
ठाणे: शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील मुलामुलींसाठी पालघर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाची चार मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण वन खात्याच्या परवानगीअभावी या बांधकामांत अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही बाब उघड केली आहे.
राज्यभरातील या ४३ मॉडेल स्कूलच्या इमारती व होस्टेलच्या बांधकामांसाठी सुमारे १८२ कोटी ३८ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन करून बांधकामांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. यानुसार तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील परंतु आता पालघर जिल्ह्यातील तलासरी, जव्हार, डहाणू, मोखाडा व विक्रमगड या पाच तालुक्यांत या स्कूल व होस्टेलच्या इमारती बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील काही शाळा वन खात्याच्या जमिनीवर असल्यामुळे त्यास अद्याप परवानगी मिळत नसल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाद्वारे या शाळा आदिवासी विभागांत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर मंजुरी मिळाली आहे, मात्र शाळेचे भूखंड वन क्षेत्रात आहेत.