दिवाळीच्या सुट्टीवरून शाळा संभ्रमात, शिक्षकांमध्ये नाराजी : परिपत्रक काढले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:43 AM2017-10-11T03:43:14+5:302017-10-11T03:44:01+5:30
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असूनही शाळांना किती दिवासाची सुटी आहे, याबाबत शालेय शिक्षण विभागाने स्पष्टता दिली नाही.
मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असूनही शाळांना किती दिवासाची सुटी आहे, याबाबत शालेय शिक्षण विभागाने स्पष्टता दिली नाही. शाळांची सुटी कधी संपणार याबाबत विभागाने परिपत्रक काढले नसल्याने शाळा आणि शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
यंदा १६ आॅक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या होणार आहेत. पण, शाळा पुन्हा कधी सुरु करायची, याबाबत अजूनही स्पष्टता दिलेली नाही. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शाळांना सुटी देण्यात आली होती. ही सुटी दिवाळीच्या सुटीत देण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, त्यामुळे दिवाळीची सुटी कमी झाल्याने शिक्षक नाराज आहेत. टीचर्स डेमोके्रटीक फ्रंटने (टीडीएफ) याविषयी तक्राक केली आहे. दरवर्षी दिवाळीची सुट्टी वीस दिवसांची असते. यंदा केवळ चौदा दिवसांचीच सुट्टी मिळेल, अशी भीती शिक्षक वतुर्ळात व्यक्त होत आहे.
१६ आॅक्टोबरला दिवाळीची सुटी सुरु होणार आहे. पण, यंदा शाळा ६ नोव्हेंबरच्या आधीच सुरु होतील, अशी चर्चा सुरु आहे. काही शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, २ नोव्हेंबरलाच शाळा सुरु केल्या जातील.
त्यामुळे यंदा विद्यार्थी व शिक्षकांना दिवाळीची सुट्टी फारच कमी मिळणार. सुट्ट्या कमी केल्या तर दिवाळीची सुट्टी केवळ सहामाही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्यातच जातील. कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, अशी भीती शिक्षकांना सतावत आहे.