शाळेने चौथीच्या विद्यार्थिनीला ठेवले डांबून
By admin | Published: January 7, 2017 02:42 AM2017-01-07T02:42:26+5:302017-01-07T02:42:26+5:30
नवीन पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील चौथीच्या विद्यार्थिनीला वर्गात डांबून ठेवल्याप्रकरणी पालक आक्रमक झाले
पनवेल : नवीन पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील चौथीच्या विद्यार्थिनीला वर्गात डांबून ठेवल्याप्रकरणी पालक आक्रमक झाले असून, आंदोलनाच्या तयारीत आहेत. पालकांनी शुक्रवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करत, शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सेंट जोसेफ शाळा अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. फीवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शाळेला एक महिन्याचा अवधी देण्यात आलेला होता. मात्र, एक महिना उलटून गेला तरी शाळेवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. शाळेची फी न भरल्याचा राग मनात ठेवून सेंट जोसेफ हायस्कूलच्या शिक्षिकेने चौथीतील तृषा हिला वर्गात डांबून ठेवले होते. यावेळी इतर विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लायब्ररीमध्ये जाण्यास सांगितले. तृषाला वर्गात बसण्यास सांगून, लाइट व फॅन बंद करून शिक्षिकेने वर्गखोलीला बाहेरून कडी लावली. तृषाने आईवडिलांना सांगितल्यावर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. मात्र, वरून आदेश असल्याचे सांगत शाळेने जबाबदारी झटकली. तर हा सारा प्रकार अनावधानाने झाल्याचे शिक्षिकांचे म्हणणे आहे. पालकांनी शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, खांदेश्वर पोलिसांनी शाळेविरोधात केवळ तक्रार दाखल करून घेतल्याने पालक नाराज आहेत. पनवेल पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, माधुरी कुबेरकर यांनी अहवाल तयार करून पाठवणार असल्याचे सांगितले.
>विद्यार्थिनीला वर्गखोलीत डांबून ठेवल्याप्रकरणी पोलीस तक्र ार दाखल करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेची चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. शाळेला यापूर्वी एक नोटीस पाठवली आहे. आता दुसरी नोटीस बजावणार आहोत.
- शेषराव बडे,
जिल्हा शिक्षण अधिकारी
>शासनाने फी भरण्यासाठी स्थगिती दिली आहे, तरीही शाळा फी भरण्यासाठी मुलांच्या मागे लागली आहे. फी भरण्यासाठी त्यांच्या वहीवर लिहून दिले जात आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याची तक्रार यावेळी पालकांकडून करण्यात आली.