शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार

By admin | Published: December 3, 2014 12:43 AM2014-12-03T00:43:58+5:302014-12-03T00:43:58+5:30

मित्रासोबत रात्री फिरायला निघालेल्या एका तरुणीवर पाच जणांनी चाकूच्या धाकावर सामूहिक बलात्कार केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

School oppression | शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार

शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार

Next

कळमन्यातील घटना : आरोपींनी केली पोलीस असल्याची बतावणी
नागपूर : मित्रासोबत रात्री फिरायला निघालेल्या एका तरुणीवर पाच जणांनी चाकूच्या धाकावर सामूहिक बलात्कार केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणी (वय २१) एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सोमवारी तिला सुटी होती. त्यामुळे तिने मित्रासोबत सकाळीच फिरायला जाण्याचा बेत बनविला. मात्र, मित्राला सायंकाळी ५ वाजता वेळ मिळाली. त्यानुसार तरुणी आपल्या अ‍ॅक्टिव्हाने नंदनवनमध्ये आली. तेथून हे दोघे स्वामी नारायण मंदिरात दर्शनाला गेले. दर्शन आटोपल्यानंतर हे दोघे अ‍ॅक्टिव्हाने महामार्गावर फिरायला गेले. विहीरगाव ते धारगाव रस्त्याच्या कडेला एकांतस्थळी ते गप्पा करीत असताना दोन दुचाकींवर पाच जण आले. ‘हम पुलीसवाले है’, असे म्हणत आरोपींनी या दोघांची चौकशी केली. त्यांना पोलीस ठाण्यात चला, असे सांगून एकाने त्या तरुणाला आपल्या दुचाकीवर बसवले. दुसऱ्या दोघांनी तरुणीच्या अ‍ॅक्टिव्हावर तिला मधात बसवले. त्यानंतर हे सर्व कापसी उड्डाणपुलाकडे निघाले. आरोपींनी शिवीगाळ करून तरुणाला मध्येच उतरवून दिले आणि तरुणीला घेऊन हुडकेश्वरकडे पळाले. वेळा गावाजवळच्या एका लेआऊटमधील निर्जन ठिकाणी पाचही जणांनी चाकूच्या धाकावर तरुणीवर पाशवी अत्याचार केला. नंतर तरुणीला तिच्या अ‍ॅक्टिव्हावर बसवून बेसा गावाजवळ आणून सोडले. कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले.
पोलिसांची शोधाशोध
आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या तरुणाने (पीडित तरुणीच्या मित्राने) लगेच रस्त्यावरच्या पोलिसांना मैत्रिणीच्या अपहरणाची घटना सांगितली. त्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाला तर नियंत्रण कक्षाने कळमना पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार कळमन्याचा पोलीस ताफा ‘त्या’ तरुणाला सोबत घेऊन अपहृत तरुणीच्या शोधासाठी परिसरात धावपळ करू लागला. कळमना, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागोजागी नाकाबंदी करण्यात आली. रात्री ९.४५ च्या सुमारास तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तिने घरी पोहोचल्याचे मित्राला सांगितले. त्यानुसार, कळमना पोलिसांचा ताफा तिच्या घरी गेला. तिने सामूहिक अत्याचाराची घटना सांगताच पोलिसही हादरले. तिच्या पालकांसह पोलीस कळमना ठाण्यात पोहोचले. तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
घटनास्थळच सापडेना
पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून अपहरण, सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींची रात्रभर शोधमोहीम राबविली. तिला आज सकाळपासून दुपारी ३ वाजेपर्यंत पोलिसांनी कळमना, नंदनवन आणि हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत फिरविले. मात्र, रात्री जेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला ते घटनास्थळच पीडित तरुणीला सांगता आले नाही. अंधारामुळे नेमकी अत्याचाराची घटना कुठे घडली, ते तिला पोलिसांना दाखवता आले नाही. वृत्त लिहिस्तोवर आरोपीही पोलिसांना गवसले नव्हते.
पोलीस आणि आयकार्ड
या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगारच असावेत, असा अंदाज आहे. या दोघांजवळ येऊन त्यांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगितले. येथे अंधारात काय करता, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तेव्हा तरुणीने धिटाई दाखवत त्यांना ‘आयकार्ड’ विचारले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी तिला ‘चल तेरे को हम आयकार्ड बताते’, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. पीडित तरुणीची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली असता, तिच्यासोबत अत्याचार झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली.

Web Title: School oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.