शाळेने उचलला ६० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार !
By Admin | Published: August 29, 2016 02:30 PM2016-08-29T14:30:38+5:302016-08-29T14:30:38+5:30
शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ चिमुकल्या विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून एका शाळेने ६० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे.
style="text-align: justify;">संतोष वानखडे
वाशिम, दि. २९ - पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ चिमुकल्या विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून एका शाळेने ६० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. रिसोड तालुक्यातील वाकद येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असे या शाळेचे नाव आहे.
शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोचविण्यासाठी राज्यभरात खासगी शाळांचे पीक चांगले बहरले आहे. यापैकी काही शाळा सामाजिक दातृत्व म्हणून विद्यार्थ्यांना काही सुविधा मोफत पुरवितात तर काही शाळा पालकांकडून जादा देणगी घेण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रिय ठरतात. या सर्व प्रकारातून वेगळी वाट शोधणारी रिसोड तालुक्यातील वाकद येथील श्री शिवाजी हायस्कूल वेगळ्याच कारणाने सध्या प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या तसेच वडिल नसणा-या विद्यार्थ्यांची गत यापेक्षाही भयावह असते. अशा गोरगरीब तसेच आई-वडिल नसणा-या, वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास पैशाअभावी बंद पडू नये म्हणून शिवाजी शाळेने एकूण ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या ‘दत्तक’ घेतले आहे.
यामध्ये ४५ विद्यार्थी हे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे असून, १५ विद्यार्थी हे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारे आहेत. या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही तसेच गणवेश, दप्तर व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा भार शाळेने उचलला आहे.
या उपक्रमाची प्रेरणा विद्यालयाचे अध्यक्ष प्रदिपराव देशमुख व शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक यांच्याकडून घेतल्याचे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा प्राचार्य प्रतापराव नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दोन विद्यार्थ्यांना आई-वडिल नसून उर्वरीत ५८ विद्यार्थ्यांचे वडिलांचे छत्र हरविले आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलून शाळेने आदर्श निर्माण केला आहे.