पथकप्रमुख आयुक्तांच्या शाळेत

By admin | Published: August 22, 2016 03:59 AM2016-08-22T03:59:33+5:302016-08-22T03:59:33+5:30

महासभेत फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावरून आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तोंडसुख घेतले.

The school principal of the Commissioner | पथकप्रमुख आयुक्तांच्या शाळेत

पथकप्रमुख आयुक्तांच्या शाळेत

Next


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शनिवारी झालेल्या महासभेत फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावरून आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तोंडसुख घेतले. रविवारी सुटीच्या दिवशी आयुक्तांनी बैठका घेत प्रभाग अधिकाऱ्यांसह फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांचा चांगलाच समाचार घेतला. फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याप्रकरणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा तसेच पथकप्रमुखाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यावर सोपवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
लोकमतने ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’च्या माध्यमातून हप्तेखोरीत फेरीवाल्यांना कसे अभय मिळते, याचा गौप्यस्फोट केला होता. यावर, शनिवारच्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे यांच्यासह भाजपाचे शैलेश धात्रक यांनी सभा तहकुबी मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेच्या वेळी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी फेरीवाला-अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची टीका केली होती. अधिकारी, कर्मचारी यांची हप्तेखोरी कशी चालते, याची माहिती ‘लोकमत’कडे आहे. परंतु, याबाबत प्रशासनाला काहीच माहिती नसणे, हे आश्चर्यकारक असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. शनिवारची महासभा एक प्रकारे ‘लोकमत’ने गाजवली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेल्या टीकेची गांभीर्याने दखल घेत आयुक्त रवींद्रन यांनी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची मदत घेऊ. याचबरोबर फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. जे लोकप्रतिनिधी कारवाईत अडथळा आणतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रविवारी आयुक्तांनी महापालिका मुख्यालयात बोलवलेल्या बैठकीला सर्व प्रभाग अधिकारी, पथकप्रमुख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील, सुनील लहाने, सुरेश पवार उपस्थित होते. आयुक्तांनी फेरीवाला पथकप्रमुखांचा समाचार घेताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यादेखील जाणून घेतल्या. या वेळी कर्मचाऱ्यांची कमतरता, नादुरुस्त अवस्थेतील वाहने, वयोमान झालेल्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा याकडे संबंधितांनी लक्ष वेधले. या समस्यांवर ठोस कार्यवाही करण्याच्या सूचना करताना पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आणि पथकप्रमुखांची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांच्या हाती सोपवण्याचे आदेश त्यांनी उपायुक्त पाटील यांना दिले. (प्रतिनिधी)
>कामचुकारांना आरोग्य विभागात टाका
जे कर्मचारी कामचुकारपणा करतात, त्यांची रवानगी सफाई कामगार म्हणून आरोग्य विभागात करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी कारवाईला अडथळा आणत असतील, तर त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनादेखील या वेळी प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Web Title: The school principal of the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.