विद्यार्थी पटामुळे शाळा श्रीमंत
By admin | Published: June 29, 2016 01:23 AM2016-06-29T01:23:13+5:302016-06-29T01:23:13+5:30
आम्हाला पटाने श्रीमंत असलेल्या शाळेत काम करायला मिळणार,’ असा आनंद शाळेत बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकांनी व्यक्त केला.
चाकण : ‘१,०६३ विद्यार्थी पटसंख्या असलेली खराबवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ग्रामीण भागातील पटाने मोठी असलेली राज्यातील पहिली शाळा असल्याने आम्हाला पटाने श्रीमंत असलेल्या शाळेत काम करायला मिळणार,’ असा आनंद शाळेत बदली होऊन आलेल्या नवीन शिक्षकांनी व्यक्त केला. शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी जड अंत:करणाने निरोप दिला. बाहेरील शाळेतून बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ व येथील बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ शाळेत झाला.
शाळा समितीचा सदस्या मंगल देवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. समिती सदस्या सारिका खराबी व मंगल देवकर, मुख्याध्यापक हरिभाऊ खोडदे, निवृत्त मुख्याध्यापिका पुष्पलता पिंगळे व शिक्षक यांच्या हस्ते सर्व नूतन शिक्षकांचे शाल, श्रीफल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर, बदली झालेल्या शिक्षकांना सर्व शिक्षकांच्या वतीने पैठणी, चोळी व पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षिका नंदा पवार, नीता जाधव, उज्ज्वला अष्टगी, मनीषा ढगे, रेणुका वसे व शिक्षक महेश पाटील यांची बदली झाल्याने कृतज्ञता सोहळ्यात त्यांना निरोप देण्यात आला. (वार्ताहर)
>पायपिटीमुळे पट वाढला
विद्यार्थी पटासाठी शिक्षकांना पायपीट करावी लागते, तर पटासाठी अपात्र झालेले शिक्षक आम्ही पाहिलेले असून खराबवाडीची शाळा ही तर पटाची श्रीमंत शाळा आहे, असे विचार नवीन शिक्षकांनी व्यक्त
केले. रोहिणी गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.
जयश्री लोहार, रेखा सपकाळ, रूपाली डुंबरे, तानाजी खैरे, संतोष भुते, दादासाहेब खरात, छाया कोल्हे, वसुधा करंडे या नवीन शिक्षकांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात आले. शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना सगळे भावुक झाले होते.