School: दप्तर भरले, शाळा कधी ? मुंबईतील शाळा १५ डिसेंबरला, ग्रामीण भागात आजपासून किलबिलाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:30 AM2021-12-01T07:30:13+5:302021-12-01T07:49:18+5:30
Coronavirus News: राज्यातील बहुतांश शाळा आज, बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड या महापालिका क्षेत्रांमधील शाळांची घंटा उशिराच वाजणार आहे.
मुंबई : राज्यातील बहुतांश शाळा आज, बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड या महापालिका क्षेत्रांमधील शाळांची घंटा उशिराच वाजणार आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक महापालिकांनी शाळा सुरू करण्याबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे बहुतांश शहरी भागांत शाळा सुरू करण्याच्या तारखांमध्ये जिल्हा प्रशासनांनी स्थानिक परिस्थितीनुसार बदल केला आहे. कोरोना महासाथीच्या दरम्यान लॉकडाऊन करण्यात आल्याने १२ मार्च २०१९ पासून सर्व शाळा बंद होत्या. बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण दिले. मात्र आता तब्बल दोन वर्षांनंतर पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे.
महापालिका क्षेत्रांत कधी?
१ डिसेंबरपासून लातूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली
१३ डिसेंबरपासून नांदेड
१५ डिसेंबरपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड
या ठिकाणी अद्याप निर्णय नाही
कल्याण-डोंबिवली (बुधवारी निर्णय अपेक्षित)
औरंगाबाद (१० डिसेंबर रोजी आढावा घेऊन निर्णय)
नागपूर (१० डिसेंबर रोजी आढावा घेऊन निर्णय)
नाशिक (१० डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून निर्णय)
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने भरण्यास सप्टेंबरपासून सुरुवात झाली. शहरातील पहिली ते सातवीचे, तर ग्रामीण भागामधील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आता भरणार आहेत. वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी बहुतेक शाळा सज्ज झाल्या आहेत.
मोठ्या पटाच्या शाळांतील वर्ग एक दिवसाआड
शाळा सुरू करताना पालकांचे हमीपत्र घेतले जाणार आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी, याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळांची पटसंख्या जास्त आहे, अशा शाळांनी दोन सत्रांत किंवा दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे, त्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही याची प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र समन्वयक, कार्यक्रम समन्वयक, पर्यवेक्षक, विषय शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
ही दक्षता आवश्यक
शाळेत हात धुण्याची व्यवस्था, तसेच जंतुनाशक, हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करणे आवश्यक
शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर सर्व स्वच्छता व सुरक्षा मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन
शाळा नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्नित करून घेणे आवश्यक
जे विद्यार्थी ऑफलाइन वर्गासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाइन शिकवणी आणि शिक्षकमित्र, पालकमित्र, गृहभेटी अशा माध्यमांतून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक