लेखी परीक्षेसाठी शाळांचा शोध सुरू
By admin | Published: May 2, 2016 12:01 AM2016-05-02T00:01:52+5:302016-05-02T00:01:52+5:30
मुंबई पोलीस दलातील शारीरिक चाचणी परीक्षा संपत आल्याने आता लेखी परीक्षेबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शहर व उपनगरातील उपलब्ध असलेल्या महाविद्यालय
मुंबई : मुंबई पोलीस दलातील शारीरिक चाचणी परीक्षा संपत आल्याने आता लेखी परीक्षेबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शहर व उपनगरातील उपलब्ध असलेल्या महाविद्यालय व शाळांबाबत माहिती जमविण्याचे सूचना सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. २२ मे रोजी शंभर गुणांचा लेखी पेपर घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यापूर्वी मैदानी स्पर्धेतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
सध्या कॉन्स्टेबलच्या पदासाठी १०० गुणांची शारीरिक चाचणी सुरु असून ५ मे पर्यंत ती चालणार आहे. पुरुष उमेदवारांची चाचणी झाली असून शुक्रवारपासून महिलाची धावणे, लांब उडी व अन्य चाचण्या कांजूरमार्ग येथील भरती केंद्रावर सुरु आहेत.
मुंबई पोलीस दलातील १ हजार २७५ पदासाठी एकुण १ लाख ५२ हजार ७९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यामध्ये तरुणीची संख्या ३३ हजार ६२३ इतकी होते. छाननीतून १ लाख ४४ हजार ७८० अर्ज पात्र ठरले होते. शारीरिक चाचणीचा निकाल विविध प्रवर्गानुसार ‘कट आॅफ लिस्ट’ साधारण १५ मे दरम्यान जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर सुमारे शंभरवर महाविद्यालयांसह शाळांमध्ये लेखी परीक्षा घेतली जाईल.
साधारण २२ मे रोजी त्यासाठीचा पेपर घेतला जाणार असून त्यापूर्वी दोन दिवस आधी संबंधित निश्चित केलेली परीक्षा केंद्र पोलिसांच्या ताब्यात घेतली जातील. पेपरसाठीची रंगीत तालीम २१ मे रोजी घेण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)