भिंत पडल्याने शाळा राहिली बंद
By admin | Published: July 28, 2016 05:55 PM2016-07-28T17:55:25+5:302016-07-28T17:55:25+5:30
भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली.
भडगाव : भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळेची भिंत पडल्याच्या घटनेचा विद्यार्थी व पालकांनी धसका घेतला असून यामुळे दुसऱ्या दिवशी कोणीच विद्यार्थी शाळेत न आल्याने शाळा बंद राहिली. या घटनेत तीन-चार विद्यार्थी जखमी झाले होते. घटनेमुळे विद्यार्थी वर्ग कमालीचा घाबरला असून २८ रोजी शाळेत एकही विद्यार्थी आला नाही. यामुळे आता शाळा कधी सुरु होईल असा प्रश्न उभा राहिला आहे.
अनेक जण मदतीस सरसावले
भिंत कोसळताच स्थानिक नागरिकांसह कजगावचेही अनेक जण मदतीसाठी धावून गेले होते. दरम्यान मातीचा ढिगार उपसण्याची काम सुरु झाले आहे. सरपंच तुकाराम जाधव, उपसरपंच राजेंद्र धनगर, सदस्य सुनील महाजन, उमेश देशमुख, मंगा नाईक, गुलाब पाटील, जिभाऊ महाजन, भिकन महाजन, पुंजू महाजन, बाबूलाल कोळी, हनुमान कोळी, शालिक पाटील, भैया पाटील, कौतिक धनगर, अर्जुन धनगर, धुडकू महाजन, संजय धनगर, नामदेव पाटील, गंभीर महाजन, दगडू महाजन, पंडित महाजन, अशोक पाटील, दत्तू धनगर, राजू कोळी आदींनी मदत केली. जेसीबी मशीनही घटनास्थळी आणले. कजगावचे दिनेश पाटील, कमलचंद धाडीवाल, छोटू जैन आदींनीही यासाठी सहकार्य केले.
अधिकाऱ्यांच्या भेटी
घटना घटताच अनेक अधिकाऱ्यांनी भेट दिली. २८ रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.देवांग, सर्व शिक्षा अभियानचे जिल्हा इंजिनिअर मृदुल अहिरराव, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.आर.कुमावत, कजगाव केंद्र प्रमुख कोमलसिंग पाटील, भडगाव पं.स. माजी उपसभापती संभाजी भोसले यांनीही भेट देवून पाहणी केली. शिक्षणाधिकारी यांनी यावेळी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना दिल्या
ग्रा. पं. कार्यालय आणि
अंगणवाड्याही धोकादायक स्थितीत
१९६२ ते ६५ मध्ये बांधलेल्या या शाळेची इमारत जीर्ण झाली असून सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. तसेच भोरटेक ग्रा.पं.ची इमारत देखील त्याच काळात उभारली गेली. ती देखील जीर्ण झाली आहे. या इमारतीवर वरुन प्लास्टीक टाकण्यात आले आहे. या इमारतीत ग्रा.पं. कार्यालय, तलाठी कार्यालय कार्यरत आहे. या इमारतीत नेहमीच मोठी वर्दळ असते. तसेच याच समोरील अंगणवाडी अवस्था, ग्रुप ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या उमरखेड या आदिवासी वस्तीतील अंगणवाडीची अवस्था, ग्रा.पं.च्या जलकुंभाची अवस्था अतिशय पडकी झाली असून या ठिकाणीही मोठी दुर्घटना होऊ शकते. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सरपंचांकडून अनेकदा निवेदन
भोरटेक येथील जलकुंभाबाबत सरपंच तुकाराम जाधव यांनी २५ मार्च २०१६ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. जळगाव यांना पत्र देवून हा जलकुंभ पाडण्यास सांगितले आहे. परंतु अनेकदा पाठपुरावा करुनही कार्यवाही झाली नाही. १४ डिसेंबर २०१५ रोजी गटविकास अधिकारी भडगाव यांना पत्र देवून जीर्ण झालेल्या अंगणवाडीमुळे नवीन अंगणवाडी मिळविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. २३ डिसेंबर १५ रोजी गटविकास अधिकारी भडगाव यांना पत्र देवून भोरटेक ग्रा.पं.साठी नवीन इमारत मंजुरीसाठी पत्र दिले आहे. कारण ग्रा.पं. इमारतही जीर्ण झाली आहे..
२७ रोजीच्या घटनेमुळे पाल्य व पालक दोघेही भयभीत झाले आहे. गाव लहान असून शाळा भरवण्यासाठी जागा उपलब्ध नाही भवानी माता मंदिराजवळील चावडीत दोन वर्गाचे विद्यार्थी तर वि.का.सोसायटीच्या इमारतीत दोन वर्ग तूर्त बसवण्याची व्यवस्था झाली आहे. जि.प.ने शाळेच्या प्रांगणात त्वरित टेंट उभारुन शाळेची तात्पुरती व्यवस्था करुन नवीन इमारतीचे काम युध्दपातळीवर सुरु करावे. टेंटचे काम १५ दिवसात मार्गी न लागल्यास शाळा बंद करु
-तुकाराम जाधव, सरपंच