पनवेलमध्ये विद्यार्थ्याने केली शाळेत आत्महत्या
By admin | Published: February 25, 2015 02:46 AM2015-02-25T02:46:58+5:302015-02-25T02:46:58+5:30
शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरील वर्गातून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये घडली.
पनवेल : शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरील वर्गातून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये घडली.
खांदा वसाहतीमधील सेक्टर १३ मधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी सकाळी सहावी इयत्तेत शिकणाऱ्या गौरव दत्तात्रेय कंक(१२) या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या गौरवने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. त्याला येथील अष्टविनायक रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच गौरवच्या नातेवाइकांनी शाळेत धाव घेतली. शाळा प्रशासनाला संबंधित प्रकाराबद्दल जाब विचारला. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने काहीही बोलण्यास नकार दिला. मुलाच्या मृत्यूस मारहाण करणारी शिक्षिकाच जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, शाळेवर विद्यार्थ्याच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका व घटनेप्रसंगी वर्गात उपस्थित शिक्षकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.