मुलांना लागली शाळेची गोडी...

By admin | Published: March 4, 2017 09:10 AM2017-03-04T09:10:33+5:302017-03-04T09:10:33+5:30

झिरवे (ता. शिंदखेडा) येथील जि.प. मराठी शाळा जिल्ह्यात मूल्यांवर आधारित शिक्षण देणारी मूल्यवर्धित शाळा ठरली आहे.

School takes school | मुलांना लागली शाळेची गोडी...

मुलांना लागली शाळेची गोडी...

Next

जैन संघटनेचे मोलाचे योगदान : गुणांचीही जोपासना करीत झिरवे शाळेत घडतेयं भावी पिढी

भिका पाटील, ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. ४ -  झिरवे (ता. शिंदखेडा) येथील जि.प. मराठी शाळा जिल्ह्यात मूल्यांवर आधारित शिक्षण देणारी मूल्यवर्धित शाळा ठरली आहे. या शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली असून शाळेची भीती नाहीशी झाली आहे. यासाठी शांतीलाल मुथा फाउंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथा ( पुणे ) यांचे मोठे योगदान आहे.
गेल्या एक वर्षापासून या शाळेत विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षण दिले जात आहे. या शाळेची प्रगती बघून संस्थेमार्फत यात निमगुळ केंद्राच्या सर्व आठही जि.प. शाळांना हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे.
शांतीलाल मुथा फाउंडेशनच्यावतीने शिंदखेडा तालुक्यातील होतकरू शिक्षक असलेली व प्रगती न झालेली शाळा व केंद्र कोणते? अशी विचारणा गटशिक्षणाधिकारी मनीष पवार यांना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी निमगुळ केंद्रातील झिरवे या शाळेचे नाव दिले. त्यानंतर संस्थेच्या प्रतिनिधींनी शाळेला भेट दिली आणि केंद्रप्रमुख भालचंद्र पाटील, मुख्याध्यापक जगन वाडिले, शिक्षक दीपक पाटील यांच्याशी चर्चा केली.
प्रतिनिधींनी त्यांना संस्थेविषयी व मूल्यवर्धित शिक्षणाबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच यास होकार दिला. नंतर या तिघांना मूल्यवर्धित शिक्षण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने द्यावे, याचे तीन दिवसांचे प्रशिक्षण फाउंडेशनतर्फे मोफत देण्यात आले. त्यानंतर झिरवे शाळेत सलग तीन महिने हा उपक्रम राबवण्यात आला.
इतर शाळांचाही आग्रह
झिरवे शाळेत कसे मूल्यशिक्षण दिले जात आहे, हे पाहण्यासाठी शिक्षक व पालक भेटी देत आहेत. या केंद्रातील निमगुळ, रामी, पथारे, धावडे, टाकरखेडा, वडदे, चावळदे या शाळेतील शिक्षकांनीही आग्रह धरल्याने फाउंडेशनतर्फे या वर्षापासून निमगुळ केंद्रांतर्गत सर्व आठही शाळांना मूल्यवर्धित शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आणि शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले.
उपक्रम पुस्तिकांचा परिपाक
संस्थेमार्फत झिरवे येथील शिक्षक व विद्यार्थ्यांना उपक्रम पुस्तिका देण्यात आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी या पुस्तिका भरून घेण्यात येतात. या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांवर असा झाला आहे की, शाळेत त्यांनी स्वत: प्रामाणिक पेटी तयार केली आहे. कुणास शाळेत व बाहेर कुणाची काही हरवलेली वस्तू सापडली की, विद्यार्थी त्या पारदर्शक पेटीत टाकतात. ती वस्तू ज्याची असेल तो शिक्षकांच्या मदतीने तेथून घेतो.


शाळेची लागली गोडी
प्रत्येक वर्गाचे उपक्रम पुस्तिकेद्वारे, विद्यार्थ्यांना गोष्टी व खेळातून या मूल्यशिक्षण वृद्धिंगत केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास कंटाळवाणा वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी, आई-वडील, मित्र व वडीलधाऱ्यांंबद्दल भीती न राहता मैत्रीपूर्ण संबंध वाढले आहेत. या शिक्षणामुळे भीती कमी झाली.


उपक्रमांचा खजिना
मूल्यवर्धन शिक्षणातून विद्यार्थ्यांना, राष्ट्रीय एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, सर्वधर्म सहिष्णूता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, सौजन्यशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यात मदत होत आहे. तसेच माझा दिनक्रम, सहकार्याची भावना, आमचे वर्गनियम, , मी आणि माझी क्षमता, असे एकूण ५६ उपक्रम या शाळेत शिकवले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी स्वत: शाळेचे नियम बनवले आहेत. त्यात शाळेत नियमित व वेळेवर येणे. स्वत:ची शाळेची स्वच्छता ठेवणे, शिक्षक शिकवत असताना लक्षपूर्वक ऐकणे हे नियम स्वत:च बनवले आहेत. या नियमांचे पालन करत नसेल तर इतर विद्यार्थी त्याला जाणीव करून देतात. कोणी भांडण करत असेल तर विद्यार्थी भांडण सोडवत नाही तर त्याचे मूळ कारण काय, ते शोधतात व शिक्षकांना सांगतात, हे विशेष! मोठ्यांशी आदराने बोलणे शिकवले जाते. कोणी आगळीक करत असेल तर त्याला आदराने बोल, असे सांगून विद्यार्थी जाणीव करून देतात. आपल्यातील क्षमता, उणीवा याबाबत विद्यार्थी न घाबरता शिक्षकांना सांगतात.

घेतली प्रगतीकडे झेप....

झिरवे येथील शाळेची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. तेथे विद्यार्थी संख्याही कमी होती. पालक कामासाठी पाल्यांना शेतीवर घेऊन जात होते. शाळेच्या बाजूलाच असलेल्या जागेचा शौचासाठी वापर व्हायचा. त्यामुळे शाळेत दिवसभर दुर्गंधी पसरायची. शाळेची नुसती इमारत होती. आता शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शाळा परिसर हगणदरीमुक्त केला. त्यानंतर शाळेला संरक्षक भिंत बांधून त्या बोलक्या केल्या. शाळा सजावट केली. विशेष म्हणजे शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी शाळा ‘डिजिटल’साठी स्वत:च्या खिशातून ३० हजार व लोकवर्गणीतून ३० हजार असे ६० हजार रुपये खर्च केले. शाळेची प्रगती पाहून दोंडाईचा येथील डॉ.आशा टोणगावकर यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून क्रीडा साहित्य, पाण्याची टाकी, विद्यार्थ्यांना बूट व मोजे, प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखपत्र, हॅण्डवॉश बेसीन आदी साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे.

Web Title: School takes school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.