प्रशासनाला माहिती न देता शाळा पाडली, इमारतीवरील पत्राही काढला; पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:45 PM2021-02-15T23:45:47+5:302021-02-15T23:46:16+5:30

The school was demolished without informing the administration : सोमवारी पुन्हा पत्रे काढत असताना पोलिसांनी घटनास्थळी येऊन काम थांबविले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

The school was demolished without informing the administration, and a letter was removed from the building; Report to police | प्रशासनाला माहिती न देता शाळा पाडली, इमारतीवरील पत्राही काढला; पोलिसांत तक्रार

प्रशासनाला माहिती न देता शाळा पाडली, इमारतीवरील पत्राही काढला; पोलिसांत तक्रार

Next

वाई : वाई येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने भाडेतत्त्वावरील जागेत गर्ल्स हायस्कूल सुरू आहे; पण रविवारी सुटीच्या दिवशीच वाई ब्राह्म समाजने प्रशासनाला पूर्वकल्पना न देता शाळा मोकळी केली. कागपत्रांसह शालेय साहित्य मोकळ्या जागेत ठेवले. तसेच पत्रेही काढले. सोमवारी पुन्हा पत्रे काढत असताना पोलिसांनी घटनास्थळी येऊन काम थांबविले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमार्फत वाई येथे महर्षी शिंदे विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज, गर्ल्स हायस्कूल सुरू आहे. संस्थेने वाई ब्राह्म समाजकडून वाईच्या रविवारपेठेतील बांधीव जागा भाडेतत्त्वावर शाळेसाठी घेतलेली आहे. संस्थेमार्फत या ठिकाणी सध्या गर्ल्स हायस्कूल चालविले जाते. असे असताना वाई ब्राह्म समाज यांनी वाई नगरपालिकेच्या पत्राचा व संस्थेला केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देऊन शाळा प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता रविवारी वर्गाची कुलपे तोडून संगणक, इलेक्ट्रिक वस्तू, महत्त्वाच्या कागदपत्रांसह शालेय साहित्य समोरील मोकळ्या जागेत काढून ठेवले.

काढलेले साहित्य गाड्यामध्ये भरत असताना परिसरातील नागरिकांच्या लक्षात संबंधित बाब आली. त्यानंतर मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी व माजी प्राचार्य राजकुमार बिरामणे, शालेय समितीचे अशोकराव सरकाळे, शिक्षकांनी शाळेत धाव घेतली. त्यावेळी ब्राह्म समाज, वाईच्या अध्यक्षा मिनल साबळे, त्यांचे पती डॉ. राजेंद्र साबळे यांच्यासोबतच अनोळखी ७ ते ८ जण शाळेच्या खोल्यामधील सामान ट्रॅक्टरमध्ये भरत असताना दिसले. तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, सोमवारी सकाळी शाळेत मुली आल्या होत्या. त्यांना घरी पिटाळण्याचा प्रयत्न करून राहिलेल्या इमारतीवरील पत्रे काढण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांचे काम थांबविले, तर शाळा प्रशासनाने संबंधितांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

शाळा दुरुस्ती करण्याबाबत ठराव झाला होता. ब्राह्म समाज, वाईच्या वतीने आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. घुसखोरी करून शाळा उचकटली व शालेय साहित्याची नासधूस केली. त्यांच्याविषयी आम्ही तक्रार केली आहे.

- रेखा ठोंबरे, मुख्याध्यापिका 


समाजातील सर्वसामान्यांच्या मुलींना या शाळेत शिक्षण देण्याचे काम सुरू होते. तसेच समाजातील अनेक दानशूर व्यक्ती मुलींच्या शिक्षणासाठी या शाळेला मदत करत होत्या. सध्या शाळेची स्थिती पाहून मुलींना अश्रू अनावर झाले आहेत. शाळा हे ज्ञानमंदिर असून त्याची नासधूस करणे हे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य आहे.
- अशोकराव सरकाळे, सदस्य शाळा समिती

शाळेला भाड्याने जागा दिली होती, तर नगरपालिकेने इमारत धोकादायक असल्याबाबत आम्हाला पत्र दिले होते. आम्ही संस्थेला पत्रव्यवहार करूनही काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका नको म्हणून आम्ही शाळा मोकळी केली आहे.

- मिनल साबळे, अध्यक्षा ब्राह्म समाज, वाई

Web Title: The school was demolished without informing the administration, and a letter was removed from the building; Report to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.