मुलांची शाळा सुटू देणार नाही

By admin | Published: March 30, 2016 12:47 AM2016-03-30T00:47:02+5:302016-03-30T00:47:02+5:30

दुष्काळी परिस्थितीत हाती पैसा न अडका असलेल्या स्थितीत गाव सोडून औरंगाबादमध्ये आलेल्या एका कुटुंबाने दिवसाकाठी मिळेल ते काम करीत मुलांची शाळा सुटू न देण्याचा निर्धार केला आहे.

The school will not let school off | मुलांची शाळा सुटू देणार नाही

मुलांची शाळा सुटू देणार नाही

Next

- नजीर शेख,  औरंगाबाद
दुष्काळी परिस्थितीत हाती पैसा न अडका असलेल्या स्थितीत गाव सोडून औरंगाबादमध्ये आलेल्या एका कुटुंबाने दिवसाकाठी मिळेल ते काम करीत मुलांची शाळा सुटू न देण्याचा निर्धार केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील डोंगरेवाडीच्या मुळे दाम्पत्याने जिद्द न सोडता जीवनाचा लढा सुरूच ठेवला आहे.
गोरख व शैला मुळे यांनी तीन मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यांचे बाराशे- तेराशे वस्तीचे डोेंगरेवाडी हे गाव. गोरख यांची भावासह १५ एकर शेती. चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत हिश्श्याच्या शेतात चांगला ८०-८५ क्विंटल कापूस निघायचा. जोडीला दोन-तीन म्हशी. खव्याचा धंदाही चालत होता. मात्र तीन-चार वर्षांत परिस्थिती पूर्ण पालटली. सततच्या दुष्काळामुळे गेल्या वर्षी आठ-नऊ क्विंटलच कापूस निघाला. आता तर शेती ओसाड पडली. मांजरा नदीही कोरडीठाक झाली.
गतवर्षी दोन मुली आणि मुलाला त्यांनी औरंगाबादेत शिक्षणासाठी भाड्याची रूम घेऊन दिली. मोठी मुलगी अमृता पत्रकारितेमध्ये बी.ए. करत आहे. धाकटी सुप्रिया डी.टी.एड.ला आहे, तर मुलगा वैभव बारावीला गेला आहे. दुष्काळामुळे दोन महिन्यांपूर्वी मुळे दाम्पत्यही औरंगाबादला आले. मुलांच्या खोलीतच राहू लागले. गोरख मुळे यांना वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत काम मिळाले. महिना सहा हजार रुपये. मात्र, अजून पहिला पगार झाला नाही.
कंपनीत सकाळी ७ वाजेपासून रात्री ७ वाजेपर्यंत ते काम करतात. शैला यांनीही मेसमध्ये पोळ््या लाटण्याचे काम सुरू केले आहे. त्या सकाळी १० वाजता बाहेर पडतात आणि रात्री १०.३० वाजता
परततात. त्यांच्या कुटुंबाचा डबाही मेसमधूनच मिळतो. त्यामुळे तेवढा खर्च वाचतो.
मुलीची बी.ए.ची वार्षिक फी याआधी मुळे दाम्पत्य भरू शकले नाही. डीटीएडच्या मुलीचाही तोच प्रश्न. मुलाला खासगी क्लास आणि अभ्यासिका यासाठी महिना सहा हजार खर्च होतो. सर्व मुलांची महिन्याकाठी १० ते १२ हजार रुपये फी भरावी लागते. दुष्काळी परिस्थितीला न डगमगता शिक्षणासाठी जिद्दीने उभे ठाकलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे.

गावाकडे आता काही नाही. महिन्यातून एखादी चक्कर होते; परंतु आता येथेच राहून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचे आम्ही ठरविले आहे. गावात जाऊन काय सांगणार हाही प्रश्नच आहे. कष्ट करण्याची तयारी तर आहेच. स्वत:ची मेस सुरू करता येते का ते पाहात आहोत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल. - शैला मुळे

शेतीत नुकसान आले. खव्याच्या धंद्यात तोटा आला. लोकांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात घेतलेले कर्ज फेडू शकलो नाही. थोडासा सैरभैर झालो. जीवन जगण्यात काय अर्थ, असा विचारही डोक्यात आला. मात्र मुलांच्या भवितव्याचा विचार करून ठरविले की, कितीही कष्ट पडले तरी ते त्यांच्यासाठी सोसायचे. - गोरख मुळे

Web Title: The school will not let school off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.