दोन वर्षांपासून पोदार शाळेत विकृत शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 12:28 AM2017-08-11T00:28:24+5:302017-08-11T00:28:56+5:30
औरंगाबाद, दि. 11 - पोदार सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थीनींना मागील दोन वर्षापासून छळणाºया आणि लगट करण्याचा प्रयत्न करणाºया एका शिक्षकाचे कृत्य ...
औरंगाबाद, दि. 11 - पोदार सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थीनींना मागील दोन वर्षापासून छळणाºया आणि लगट करण्याचा प्रयत्न करणाºया एका शिक्षकाचे कृत्य मुलींच्या तक्रारीनंतर समोर आले असून विलास विश्राम काकडे (३६, रा. भोईवाडा) या शिक्षकविरुध्द जवाहरनगर ठाण्यात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या शिक्षकाला शाळेने बुधवारीच शाळेतून काढून टाकले आहे.
शिक्षकाच्या विकृत जाचाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींनी मागील दोन वर्षापासून चालू असलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी गुरुवारी दुपारी प्राचार्यांना घेराव घालून या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. याचवेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि कार्यकर्तेही तिथे पोहोचले आणि प्राचार्यांना यासंबंधी जाब विचारत ‘त्या’ शिक्षकाविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली.
काकडे हा पोदार हायस्कूलमध्ये गणित विषय शिकवतो. आठवी-नववीच्या विद्यार्थिनींसोबत काही ना काही कारण काढून तो जवळीक करण्याचा प्रयत्न करीत असे, शालेय प्रशासनाकडे याविषयी अनेकदा तक्रार देऊनही त्याच्यावर काहीच कारवाई न करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, अशी तक्रार पालकांनी केली.
विलास काकडे दोन वर्षांपूर्वी पोदार शाळेत रुजू झाला. विद्यार्थिनींना त्यांच्या खासगी गोष्टी विचारणे, त्यांना शाळेबाहेर भेटण्यास सांगणे, पालकांच्या मालमत्तेबद्दल विचारणे, मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर घुटमळणे, लैंगिक चर्चा करण्यास त्यांना उद्युक्त करणे, त्यांच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणे, वाईट नजरेने बघणे असे विकृत प्रकार तो करीत असे, प्रसंगी गुण कमी देण्याचे अथवा नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनींवर दबाव टाकत असे. असा अनुभव केवळ एका मुलीचा नाही, तर शाळेतील अनेक विद्यार्थिनींना दररोज या छळाला सामोरे जावे लागे; परंतु भीतीपोटी त्या घरी सांगत नसत.
एका विद्यार्थिनीने हिंमत करून दोन दिवसांपूर्वी तिच्या काकांना हा सगळा घाणेरडा प्रकार सांगितला. त्यांनी बुधवारी प्राचार्यांकडे याबाबत तक्रार केली. यावेळी त्यांनी विलासला चांगलाच चोपही दिला. त्याला तात्काळ नोकरीवरून काढण्यात आले. हा प्रकार कळताच इतर विद्यार्थिनींनासुद्धा धाडस आले. त्यांनी आपापल्या पालकांना त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. एवढ्या वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना शाळेने तो रोखण्यासाठी काहीच का केले नाही, याचा जाब विचारण्यासाठी शेकडो पालक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता शाळेत दाखल झाले. साठ-सत्तर विद्यार्थिनींनी पालकांसमक्ष रडतच विलासच्या दुष्कृत्यांची आपबिती सांगितली.
‘तुम्ही त्या शिक्षकावर गुन्हा नोंदवा, नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू’ असा पवित्रा संतप्त जमावाने घेतला. व्यवस्थापनाने मात्र टाळाटाळ करून प्रकरण न वाढविण्याची मागणी केली. ‘शाळेचे नाव खराब होईल या भीतीपोटी किती दिवस प्रकरणे दाबत राहणार’ असे म्हणत पालकांनी प्राचार्यांना घेऊन जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले.
‘काकडे सरसे बचके रहना’
विलासची दहशत एवढी होती की, शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनींनी नववीच्या मुलींना ‘काकडे सरसे बचके रहेना’ असा इशारा दिला होता. मुलींना तो ट्युशन कोणती लावली, तुला सोडायला कोण येते, गेटमध्ये सोडतात की गेट बाहेर, मी येतो तुला सोडायला, क्लास बुडवून बाहेर फिरायला जायचे का, मुलांना त्यांच्या आईचा मोबाइल क्रमांक आणि घरी किती प्रॉपर्टी आहे, असे विचारायचा. गणिताचा शिक्षक असूनही मैदानावर जाऊन मुलींना धावताना पाहत बसायचा.
एका विद्यार्थिनीने सांगितले की, ‘ते एकदा मला म्हणाले होते की, तू माझ्यासाठी काय-काय करू शकते. मला कळलेच नाही काय बोलावे; पण ते म्हणाले, तू विचार कर. तू माझ्यासाठी खूप काही करू शकते.’ त्या मुलीच्या वर्गमित्राने तिला हिंमत देऊन घरी सगळे खरे खरे सांगण्यास सांगितले.
वर्गात सीसीटीव्ही नाही
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असायला हवी; परंतु पोद्दार हायस्कूलच्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. याबाबत पालकांनी विचारले असताना प्राचार्यांनी सांगितले की, ‘सीसीटीव्ही केवळ कॉरिडोरमध्ये असून लवकरच वर्गांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची आम्ही व्यवस्थापनाकडे मागणी करू.’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी शाळा एवढी कशी बेजबाबदार राहू शकते? यामुळेच विलासचा विक्षिप्तपणा बेलगामपणे सुरू राहिला, असे पालकांचे म्हणणे आहे.
अशा शाळेत आम्ही मुले का पाठवावी?
एवढे पैसे खर्च करून आम्ही मोठ्या विश्वासाने आमच्या मुला-मुलींना शाळेत पाठवतो; पण शाळेतील शिक्षकच जर असे गैरप्रकार करत असतील आणि शाळादेखील त्यांना पाठीशी घालून स्वत:चे नाव वाचविण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा शाळेत आम्ही मुले का पाठवायची? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला. अनेक वेळा तक्रार देऊनही शालेय प्रशासनाने विलास काकडेला अभय दिले. काही होण्याची ते वाट पाहत होते का? महिला उपप्राचार्य असूनही विद्यार्थिनींवर असे अत्याचार होत असल्याबाबत पालकांनी रोष व्यक्त केला. आजसुद्धा जेव्हा सगळे पालक शाळेत जमले तेव्हासुद्धा शाळेने मुलींना वर्गाबाहेर येऊ दिले नाही. त्यांना खरे सांगण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. विलासला केवळ नोक रीवरून काढून चालणार नाही. तो पुन्हा दुसरीकडे असे करू नये म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंदविला पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.
आणखी काळजी घेऊ
विलास काकडेच्या शिकविण्याविषयी तक्रारी होत्या. मात्र, तो छेडछाड करण्याची कोणतीही तक्रार नव्हती. झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, येथून पुढे असे न होऊ देण्यासाठी आम्ही आणखी काळजी घेऊ. विद्यार्थ्यांनासुद्धा अधिक मोकळ्यापणाने संवाद साधण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
- अभिजित दिवे, प्राचार्य, पोदार सीबीएसई स्कूल
पालकांनो, ही काळजी घ्या
अशा प्रकरणांमध्ये भीती व दबावतंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यात येतो. एका मानसिक तणावाखाली हे विद्यार्थी अत्याचार सहन करीत असतात. पालक व शालेय प्रशासनाने वेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे, तरच अशा घटनांना आळा बसेल. विद्यार्थ्यांच्या स्वभावातील बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
अनेक पर्याय उपलब्ध
अशा प्रकारच्या घटनेनंतर ‘महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१’ कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास शिक्षणाधिकारी शाळेला कारवाईचे निर्देश देतात. त्यानंतर कारवाई न केल्यास ‘आरटीई २००९’ कायद्यानुसार शिक्षण संचालकांकडे शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव केला जाऊ शकतो.
- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग
विद्यार्थ्यांवरील अत्याचार : एक गंभीर समस्या
- जून महिन्यात शहरातील खासगी कोचिंग क्लासमधील मॅनेजर व कर्मचारी मुलींची छेडछाड काढत असल्याचे प्रकरण खूप गाजले होते.
-केल्याची घटना घडली होती.
- जिन्सी परिसरातील एका इंग्रजी शाळेतील संगणक शिक्षकानेदेखील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
- तीन वर्षांपूर्वी स. भु. प्रशालेतील बालिकेवर स्कूल व्हॅनचालकाने बलात्कार केला
होता.
- अशा या धक्कादायक घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
रक्षकच भक्षक बनले!
आई-वडिलानंतर आपण गुरुलाच स्थान देतो. शिक्षकासारख्या पवित्र नात्याला कलंक लावणारी ही घटना आहे. पालकांनी अशा घटनांची माहिती त्वरित शालेय प्रशासनाला द्यावी. शाळेकडून जर प्रतिसाद मिळाला नाही, तर पोलीस आणि बालकल्याण समितीकडे दाद मागण्याचा मार्ग खुलाच आहे.
- अॅड. रेणुका घुले, अध्यक्षा, बालकल्याण समिती
पालकांना सूचित करा
कोणी जर गरजेपेक्षा जास्त लगट अथवा स्पर्श करत असेल किंवा हातवारे वाईट नजरेने बघत असेल, तर मुला-मुलींनी न घाबरता याबाबत त्वरित पालकांना सूचित करावे, अशा प्रकारचे गैरवर्तन वेळीच थांबविले गेले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागरुकता वाढविण्याची गरज आहे.
- डॉ. संदीप शिसोदे, समुपदेशक