शाळांनी वह्या, पुस्तकांची विक्री करणे थांबवावे!
By admin | Published: April 1, 2017 04:05 AM2017-04-01T04:05:58+5:302017-04-01T04:05:58+5:30
शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की
मुंबई : शाळेच्या परीक्षा संपल्या, निकाल लागल्यावरही पालकांना शाळेच्या खेपा माराव्या लागतात. एकच कारण असते की, पुढच्या वर्षीच्या वह्या, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य हे शाळेतूनच घेणे विद्यार्थ्यांना अनिवार्य केलेले असते. खरे तर महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई अशा कोणत्याही शाळांना वह्या, पुस्तके आणि अन्य शाळेचे साहित्य विकण्याची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली आहे. तरीही शाळा खुलेआमपणे विक्री करून पालकांना लुबाडतात. शाळांनी हे थांबवावे, अशी मागणी करणारे पत्र बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोसिएशनने शिक्षणमंत्री आणि शाळांना पाठवले आहे.
नियमांनुसार कोणतीही शाळा त्यांच्या कोणत्याही साहित्याची, पुस्तकांची विक्री करू शकत नाही. हा नियम सर्व शाळांना लागू होतो. तिसऱ्या व्यक्तीला कंत्राट देऊनही शाळेच्या आवारात विक्री करण्यास मनाई आहे. तरीही या नियमाची पायमल्ली होताना दिसते आहे. याचबरोबर शाळा कोणत्याही एका दुकानदाराचे अथवा डिलरचे नाव पालकांना सांगू शकत नाही. तरीही शाळांमध्ये हे प्रकार घडतात. पालकांना पुस्तके, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य घेण्याचा अधिकार असूनही त्यांना नाकारला जातो. या गोष्टी थांबाव्यात म्हणून शाळांना आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. (प्रतिनिधी)
हवे तसे दर आकारणे थांबवणे गरजेचे
शाळांमधून विकल्या जाणाऱ्या वह्या-पुस्तक, गणवेशासाठी पालकांकडून अधिक पैसे आकारले जातात. या वस्तूंवर किमती नसतात. मुद्दामहून वह्या, पुस्तकांचे आकार अर्धा किंवा एक इंच जास्त सांगितले जातात. सामान्य आकाराच्या वह्या सांगितल्या जात नाहीत. त्यामुळे पालकांना त्या बाजारात उपलब्ध होत नाहीत.
शाळा यासाठी कोणताही कर भरत नाहीत. त्यांची नोंदणी नसते. त्यामुळे त्यांना हवे तसे दर आकारतात. हे थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर कारवाई केली पाहिजे. निकालाच्या दिवशी शाळेने साहित्याची यादी देणे अपेक्षित असल्याचे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते जयंत जैन यांनी सांगितले.