शाळांची होणार राष्ट्रीय ’ गुणवत्ता संपादन चाचणी, अमरावती जिल्ह्यात १६३ शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 06:00 PM2017-11-12T18:00:49+5:302017-11-12T18:06:42+5:30
देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
अमरावती : देशातील शिक्षणाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार देशातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असते. हे गुणवत्तेच्या अनुषंगाने केले जाणारे राष्ट्रीय सर्वेक्षण असून जिल्ह्यातील निवडलेल्या १६३ शाळांमध्ये ही लेखी चाचणी १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शिक्षण विभागाने पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत चाचण्यांचा पर्याय शोधण्यात आला. ती गुणवत्ता तपासण्यासाठी देशातील सर्व राज्यांतील शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
राज्यात जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता वाढविण्यासाठी काम केले जाते. देशपातळीवर दिल्लीत ह्यन्यु प्राह्णतर्फे देशभरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकाही तयार केल्या आहेत. सीलबंद प्रश्नपत्रिका त्या-त्या शाळांच्या ठिकाणी पोहोचल्या असून परीक्षेच्या दिवशी ते फोडण्यात येतील. या चाचणीचे स्वरूप शिक्षक प्रश्नावली असे असणार आहे.
विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नावलीत पर्यायी प्रश्नांचा समावेश असून प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्यायांना विद्यार्थ्यांनी गोल करणे अभिप्रेत आहे.
तिसरी, पाचवीसाठी ४५ गुण यामध्ये भाषा विषयासाठी १५ गुण, गणित विषयासाठी १५ आणि परिसर अभ्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. तर आठवीसाठी ६० गुण यामध्ये भाषा १५ गुण, गणित १५, सामान्य विज्ञान १५ गुण, समाजशास्त्र १५ गुण असणार आहेत. तिसरी व पाचवीसाठी ९० ते १२० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राखीव आहे.
चाचणीच्या दिवशी शासकीय स्तरावरून स्वतंत्र होत पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांच्यामार्फत परीक्षा नियंत्रित केली जाणार आहे. या चाचणीसाठी पाचपेक्षा अधिक पटसंख्येच्या शाळांची चाचणीसाठी निवड केली आहे. यात जिल्ह्यातील १६३ शाळांची निवड केली आहे. यात तिसरी, पाचवीतील प्रत्येकी ६१, तर आठवीच्या ६१ शाळा आहेत. यात १७३ वर्गांचा समावेश आहे.
स्वतंत्र अभ्यासक्रम नाही
या परीक्षेच्या निमित्ताने अभ्यासक्रम कोणता, असा प्रश्न शाळांना पडला आहे. या चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नाही. सर्व प्रश्न इयत्तेच्या क्षमतेवर आधारित असणार आहेत. त्यामुळे सध्या राबविल्या जात असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही मूल्यमापन प्रक्रिया होणार आहे.
या परीक्षांची तपासणी ओएमआर पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुक्याचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रत्येक तालुका, जिल्हा व राज्य गुणवत्तेचे कोठे आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.