ठाण्यात विज्ञान केंद्र, समृद्धीलगत १८ नवनगरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निर्णयांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:57 AM2023-06-21T07:57:52+5:302023-06-21T07:58:04+5:30
कोल्हापुरी गूळ, हळद आणि बांबू या महत्त्वाच्या उत्पादनांविषयी आयोग राबवत असलेल्या कार्यक्रमाची यावेळी चर्चा झाली.
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नावीन्यता उपक्रम केंद्र सुरू करणे, लोणार सरोवर (जि. बुलढाणा) येथे केंद्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि एमटीडीसीच्या वतीने सुरू असलेला प्रकल्प गतीने पूर्ण करणे, ठाणे येथे विज्ञान केंद्र सुरू करणे असे विविध निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी मंगळवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोगाच्या कामकाजाबाबत व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक विकासासाठी नावीन्यपूर्ण कृती कार्यक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
कोल्हापुरी गूळ, हळद आणि बांबू या महत्त्वाच्या उत्पादनांविषयी आयोग राबवत असलेल्या कार्यक्रमाची यावेळी चर्चा झाली.
‘वनौषधींचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा’
शेतकऱ्यांना फायदा होईल अशारितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत, त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या जंगलांमध्ये आणि परिसरात वनौषधींची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनादेखील त्यांची माहिती आहे. या सर्व नैसर्गिक संपत्तीचे व्हॅल्यू ॲडिशन होऊन, त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे. समृद्धी महामार्गालगतची १८ नोड्स म्हणजे नवनगरे विकसित होतील. याठिकाणी विविध पायाभूत सुविधांच्या दृष्टीने विकास होईल.