मराठीतील विज्ञानविषयक मासिके
By Admin | Published: January 29, 2017 12:26 AM2017-01-29T00:26:23+5:302017-01-29T00:26:23+5:30
सन १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दिग्दर्शन’ हे विज्ञानविषयक मासिक सुरू केले. ते १८४६ साली त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडले. पण त्यामुळे समाजाला विज्ञान विषयक लिखाण हवे आहे
- अ. पां. देशपांडे
सन १८४० मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दिग्दर्शन’ हे विज्ञानविषयक मासिक सुरू केले. ते १८४६ साली त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडले. पण त्यामुळे समाजाला विज्ञान विषयक लिखाण हवे आहे, हे ध्यानात आल्यावर, १८५० नंतर मराठीत मराठी ज्ञान प्रसारक, ज्ञान चंद्र्रिका, विविध ज्ञान विस्तार, सृष्टीज्ञान चंद्रिका, मासिक मनोरंजन, करमणूक अशी बरीच मासिके निघाली. वर उल्लेख केलेल्या मासिकातून साहित्याबरोबरच आरोग्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, शेती, खगोल, भूगर्भ, भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, गणित इत्यादी विषयांवर लेख छापून येऊ लागले. असे लेख लिहिणाऱ्या लेखकांत लोकमान्य टिळक, केरूनाना छत्रे, शं.बा.दीक्षित, प्राचार्य गो.रा.परांजपे , दि.धों कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रा.श्री.म.माटे, श्री.ह.रा.दिवेकर, प्रा.भालबा केळकर, श्री.के.रा.कानिटकर, डॉ.चिं.श्री.कर्वे, प्रा.प.म.बर्वे, प्रा.रा.वि. सोवनी, प्रा.ना. वा. कोगेकर, प्रा.चं. वि. तळपदे, वैद्य पु. स. हिर्लेकर, वैद्य पां.ह.देशपांडे, वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी, श्री.वा.रा.कोकटनूर आणि अगदी अलीकडच्या काळात, प्रा.जयंत नारळीकर, डॉ बाळ फोंडके, श्री.निरंजन घाटे, श्री.अ. पां. देशपांडे, शैलेश माळोदे, हेमंत लागवणकर यांनीही विपुल लिखाण केले. १८३० ते १९५० या १३० वर्षाच्या कालखंडात मराठीतून जे जे विज्ञानविषयक लेख छापले गेले, मग ते पुस्तकात असोत, की मासिकात, की वर्तमानपत्रात, त्यातील निवडक २०० लेख ४००-४०० पानांच्या दोन खंडात मराठी विज्ञान परिषद आणि विज्ञान प्रसार या केंद्र सरकारच्या संस्थेने सन २०११ मध्ये छापले आहेत. १९२८ साली पुण्यात सृष्टिज्ञान या नावाचे केवळ विज्ञानाला वाहिलेले मासिक, प्राचार्य गो. रा. परांजपे, प्रा. दि. धों. कर्वे आदी लोकांनी सुरू केले. ते मासिक आजही सुरू आहे. पुढे १९६६ सालापासून मराठी विज्ञान परिषद पत्रिका, उद्यम आणि विज्ञानयुग ही विज्ञानविषयक मासिके सुरू झाली. त्यातील आता उद्यम आणि विज्ञानयुग ही मासिके बंद पडली. ही मासिके विज्ञानाच्या सर्व विषयांवर लेख देत असत. पण विज्ञानाच्या एकेका विषयाला वाहिलेली अनेक मासिके आहेत. उदाहरणार्थ, शेतीवर शेतकरी, आपली शेती, बळीराजा इत्यादी तर आयुर्वेदावर आरोग्य मंदिर, आयुर्विद्या, आयुर्वेद पत्रिका अशी आहेत. खगोलावर नभांगण पत्रिका, खगोल अशासारखी मासिके चालू होती,मात्र त्यातील नभांगण पत्रिका आता बंद पडले.
त्या त्या वेळी विज्ञान व्यक्त करण्यासाठी वापरल्या गेलेल्या मराठी भाषेचे नमुने पाहण्यासारखे आहेत. उदा.१९२८ साली सुरू झालेल्या सृष्टिज्ञान मासिकातील प्राचार्य गो. रा. परांजपे यांच्या लिखाणातील दोन उतारे खाली दिले आहेत, ते पाहण्यासारखे आहेत.
हिरवे पान हा अन्नाचा कारखाना आहे. अन्न खाल्ल्यावर शरीरात बिनज्योतीचा जाळ पेटतो. शरीरात हालचाल सुरू होऊन शरीराला उबही मिळते. हालचाल म्हणजे जीवाची क्रिया. जीव हे सूर्यप्रकाश साठविल्याचे द्योतक. म्हणून जीव व अन्न एक आहेत. दुसरे उदाहरण पाहा, ध्वनी लहरी म्हणतात, मला बोलता येते पण चालता येत नाही, तर विद्युत लहरी म्हणतात, मला लांब चालता येते पण बोलता येत नाही. ध्वनी लहरी विद्युतलहरींच्या पाठीवर बसून आकाशातून हजारो मैल जाऊ शकतात. या अशक्त ध्वनीलहरी मोठ्या मनुष्याच्या खांद्यावर बसविलेल्या मुलाप्रमाणे जर दुसऱ्या कसल्यातरी जास्त ताकदवान व वेगवान अशा वाहकाच्या खांद्यावर चढवल्या...