वैज्ञानिक कथा, कादंबरी हेही साहित्यच, डाॅ. जयंत नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात केला विज्ञान लिखाणाचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:10 AM2021-12-04T07:10:01+5:302021-12-04T07:10:11+5:30
वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध वा त्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात मानत नाही. परंतु वैज्ञानिकाने सामान्यांपर्यंत शोध पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन.
- धनंजय रिसोडकर
कुसुमाग्रजनगरी, नाशिक : वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध वा त्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात मानत नाही. परंतु वैज्ञानिकाने सामान्यांपर्यंत शोध पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. वैज्ञानिक कल्पनेभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी विज्ञान साहित्य म्हणून मानल्यास आक्षेप असू नये, असे प्रतिपादन ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रख्यात
शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी शुक्रवारी केले.विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात मिळाली. त्यामुळे मराठीचे अपूर्णत्व जास्त कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्याबाबतीत, अशी खंतही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. नाशकात सांयकाळी संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील, पसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कुठल्याही भाषेतील साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असाे, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ‘ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही’ इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे, असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले.
विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यांना करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इन्स्टिट्यूशन ते काम बजावीत आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.
गडकिल्ल्यांच्या स्मृती जपा : विश्वास पाटील
शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रुपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे कर्तव्य आहे, असे मत संमेलनाचे उद्घाटक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
सत्य लिहिणारे ठरतात राष्ट्रविरोधी : जावेद अख्तर
सक्षम लोकशाहीसाठी संसद, शासन, विरोधक याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. त्यामुळे साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायला हवे असे प्रतिपादन जावेद अख्तर यांनी केले. ते म्हणाले, एखादा लेखक काल्पनिक लिहितो, तोपर्यंत तो चांगला वाटतो. मात्र तो सत्य लिहितो तेव्हा त्याला पूर्वी वाईट ठरवले जाई, आता त्याला राष्ट्रविरोधी ठरवले जाते. राज्यकर्ते आणि लोकांना काल्पनिक लिहलेले आवडते. मात्र रस्त्यावरील लढाई लढणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे नको असतात. साहित्यिकानी पक्षनिष्ठा पाळत न बसता देशहितासाठी लिहिले पाहिजे.