समुद्राच्या तळासह लाटांचाही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:13 AM2018-10-19T05:13:43+5:302018-10-19T05:13:54+5:30
मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार सर्व मंजुरींचा अडथळा पार ...
मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार सर्व मंजुरींचा अडथळा पार पडल्यानंतर महापालिकेने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले.
समुद्रकिनाऱ्यालगत बांधण्यात येणारा देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच मार्ग असल्याने समुद्र तळ, किनाºयाची उंच-सखलता आणि लाटांचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मदतीने १ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होईल.
दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा हा ‘सागरी किनारा रस्ता’ (कोस्टल रोड) असेल. या प्रकल्पावर गेल्या १५ दिवसांत संबंधित ठेकेदार व सल्लागारांनी केलेली कार्यवाही व पुढील नियोजनाचा आढावाही घेण्यात आला.
कोस्टल रोडसंदर्भात पंधरवड्यात करण्यात आलेल्या या कामांचा सविस्तर आढावा मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी एका विशेष बैठकीत नुकताच घेतला आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) संजय सेठी, किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांच्यासह संबंधित अधिकारी, प्रकल्प सल्लागार, ठेकेदार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
९० दिवसांच्या आत रेखाचित्र सादर करावे लागणार
‘शामलदास गांधी मार्ग’ ते ‘बडोदा पॅलेस’पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे कंत्राट हे ‘एल अॅण्ड टी’ कंपनीला देण्यात आले आहे. याबाबतचे कार्यादेश संबंधित कंपनीला २९ सप्टेंबरला देण्यात आले. तर ‘बडोदा पॅलेस’ ते ‘वांद्रे वरळी सी-लिंक’ दरम्यानच्या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट एच.सी.सी. व एच.डी.सी. या संयुक्त कंपनीला देण्यात आले असून त्यांना १ आॅक्टोबरला कार्यादेश देण्यात आले. दोन्ही कंपन्यांना कार्यादेश दिल्यापासून ९० दिवसांच्या आत कोस्टल रोडचे प्राथमिक रेखाचित्र सादर करावे लागणार आहे.