नवनिर्मितीतून घडतो शास्त्रज्ञ

By admin | Published: February 28, 2017 01:30 AM2017-02-28T01:30:23+5:302017-02-28T01:30:23+5:30

विज्ञान अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. त्यामुळे वर्गाबाहेर शिकतो ते अधिक महत्त्वाचे असते.

Scientist Is Made From New Creation | नवनिर्मितीतून घडतो शास्त्रज्ञ

नवनिर्मितीतून घडतो शास्त्रज्ञ

Next


पुणे : ‘विज्ञान अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. त्यामुळे वर्गाबाहेर शिकतो ते अधिक महत्त्वाचे असते. भवतालचे निरीक्षण करून शास्त्रीय ज्ञान आत्मसात करून त्यास कल्पक शक्तीची जोड दिल्यास नवनिर्मिती करणे शक्य होते. उत्सुकता, सर्जनशीलता आणि नवनिर्मिती यांतूनच शास्त्रज्ञ आणि कलाकारही घडत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या तीन गोष्टी आत्मसात कराव्यात,’ असे प्रतिपादन आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भारतीय विद्याभवन संस्थेच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘यंग एक्सप्लोरर’ या आंतरशालेय विज्ञानप्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, भारतीय विद्या भवन संस्थेचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिकेचे मानद संचालक अनंत भिडे, नेहा निरगुडकर, भारती बक्षी आदी उपस्थित होते. धांडे म्हणाले, ‘शास्त्रज्ञ संशोधनातून नवनिर्मिती करतो, तर कलाकार साधनेतून कलाकृती साकारतो. शास्त्रज्ञ आणि कलाकार यांचा संगम झाला, तर अनेक नव्या गोष्टी निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ व कलाकार यांच्यातील गुण आत्मसात करून शास्त्रकार बनावे.
कुणाल कुमार म्हणाले, ‘सध्या प्रत्येक क्षेत्रात इनोव्हेशनमुळे मोठे बदल घडत आहेत. समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी इनोव्हेशन महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेरचा विचार करण्याची सवय लावली पाहिजे.’
नंदकुमार काकिर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. अनंत भिडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. या प्रदर्शनात एकूण ६९ प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. यासाठी ४५ शाळांतून २५० पेक्षा अधिक प्रकल्प आले होते. ज्युनिअर व सिनिअर गटात ही स्पर्धा आयोजिली आहे. पुणे पोलीस पब्लिक स्कूल आणि चंद्रकांत दरोडे विद्यालय या दोन महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्मार्ट सिटी, स्टेप क्लायंबिग बास्केट, मल्टिपर्पज सेफ्टी फॅन, मोड्यूलोपेंडुलम असे विविध प्रकारचे प्रकल्प इथे विज्ञानप्रेमींना मोफत पाहता येणार आहेत. रश्मी बहुलकर व स्नेहलता शेलार यांनी या प्रकल्पाचे संयोजन केले आहे.
<प्रश्नमंजूषा स्पर्धेत ‘ब्लू रिज’ शाळेला प्रथम क्रमांक
विज्ञानशोधिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत ब्लू रिज शाळेला प्रथम क्रमांक मिळाला. हर्ष पाटील, अखिलेश खांबेकर आणि आयुष मंचालवार या विद्यार्थ्यांच्या गटाने बाजी मारली. सिम्बायोसिस स्कुलने द्वितीय तर, कल्याणीनगर येथील बिशप स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक मिळवला. ३० शाळेतून ५६ प्रवेशिका आल्या होत्या. लीप अँड स्केलच्या प्रशांत जोशी यांनी प्रश्नमंजुषा स्पधेर्चे संचलन केले.

Web Title: Scientist Is Made From New Creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.