धर्माला वैज्ञानिकतेची जोड द्यावीच लागेल!
By admin | Published: August 16, 2015 02:05 AM2015-08-16T02:05:05+5:302015-08-16T02:05:05+5:30
धर्म आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माला राजकारणापासून दूर ठेवावेच लागेल. हे करताना धर्माला वैज्ञानिकतेची जोड द्यावीच लागेल... अशा शब्दांत आचार्या चंदनाजी
- अतुल कुलकर्णी, मुंबई
धर्म आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माला राजकारणापासून दूर ठेवावेच लागेल. हे करताना धर्माला वैज्ञानिकतेची जोड द्यावीच लागेल... अशा शब्दांत आचार्या चंदनाजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत आल्यानंतर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे चंदनाजी यांनी आपली स्वत:ची ओळख तयार केली आहे. जैन समाजात त्यांच्याविषयी असणाऱ्या वेगळ्या मतप्रवाहाबद्दलदेखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विरायतनच्या वतीने ‘जेथे देवालय तेथे विद्यालय’ असा प्रकल्प आचार्या चंदनाजी यांनी हाती घेतला आहे. देशभरात या माध्यमातून तीर्थक्षेत्रांच्या विकास प्रकल्पासोबत २०० शाळा भारतभर बांधण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि मुंबईत कांदीवली येथे शाळा उभ्या करण्याविषयी बोलणी चालू आहेत. देवालयांच्या ठिकाणी विद्यालय उभे करण्याचा विचार आपल्या मनात कसा आला याविषयी विचारले असता आचार्या चंदनाजी म्हणाल्या, भगवान महावीर यांच्या निर्वाणभूमीत, पावापुरी येथे मंदिरात बसले होते. मंदिराबाहेर लहान मुलं अनवाणी उभी होती, खाण्यासाठी मागत होती. मी त्यांना शाळेत का जात नाही असे विचारले तेव्हा मला सांगण्यात आले की या गावात शाळा नाही. त्याच ठिकाणी मला ही कल्पना सुचली. हमने सेवा के गीत तो बहोत गाये... लेकीन सेवा के विचार को आचरण में नही ला पायें... असे सांगताना त्या म्हणाल्या, समुद्राचे सगळेच पाणी खारे आहे ते तर आम्ही बदलू शकत नाही; पण एखाद्या गरीब मुलाच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या खाऱ्या पाण्याची आसवं आम्ही पुसू शकलो तर तेच खरे मंदिर आहे आणि तीच खरी पूजा..! धर्मापेक्षा प्रेमाने सगळ्यांना जोडण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यांच्याशी झालेली ही बातचित -
प्रश्न : आपण विमानाने, कारने प्रवास करता, साध्वी झाल्यानंतर हे करण्याची मान्यता नाही; तरीही आपण हे कसे काय करता? समाजात काहींचा या सगळ्याला विरोध आहे. त्याबद्दल काय सांगाल?
मला राष्ट्रसंत अमरमुनीजींनी आचार्या बनवले हे मी आवर्जून आधी सांगते. पण आजही साधूंना एक नंबर आणि साध्वींना दोन नंबरची भूमिका असते. पुरुषसत्ताक वर्चस्वातून असे घडत असावे. आजही जो सन्मान साधूंना मिळतो तो साध्वींना दिला जात नाही. पण मातृसत्ताक संस्कृतीला जेथे श्रेष्ठत्व दिले जाते तो समाज कायम प्रगती करतो हा इतिहास आहे. जर महिलांना सन्मान दिला गेला असता तर युद्धे झाली नसती आणि संघर्षही टाळता आले असते. सामाजिक
क्षेत्रात पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी कमावण्याचे काम करायचे आणि महिलांना चूल मूल यात अडकून पडायचे असे चित्र तयार केले. मुलगा कमावता आहे तर त्याचे कौतुक होते पण मुलगी पैसे कमावण्याचे काम करू लागली तर तिची मात्र उपेक्षा होते. नोकरी करणाऱ्या मुलीलादेखील तेवढाच सन्मान मिळाला पाहिजे. आता याबाबतीत लोकांमध्ये जागृती होऊ लागली आहे; पण आजही अनेक ठिकाणी मुलगी झाली म्हणून दु:ख करणारेही याच समाजात आहेत. हे जेव्हा बदलेल तेव्हा असे प्रश्न विचारण्याची वेळच उरणार नाही.
मात्र समाजात अशा गोष्टी आजही घडत आहेत. याचा दोष कोणाला द्यायचा? या अशा नकारात्मक गोष्टींची जबाबदारी कोणाची?
जबाबदारी कोणाची त्याहीपेक्षा आम्ही स्वत: कसे वागतो हे जास्त महत्त्वाचे आहे. आम्ही स्वत:ला खूप छोटे मानतो. मी एकटा काय करू शकेन? माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने असे काय होणार? असे आम्ही सतत म्हणत राहतो. पण तुम्ही अमावस्येच्या रात्री एक दिवा लावून दीपावलीचा आनंद देऊ शकता. मी एक झाड लावते, तुम्हीदेखील एक झाड लावा आणि जगवा अशी भूमिका घेतली तर ही पृथ्वी नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. आम्ही फक्त आलोचना करत राहतो. दुसऱ्यांवर टीका करण्यात वेळ वाया घालवतो. दुसऱ्यांमध्ये असणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी आधी पाहतो पण दुसऱ्याने काय चांगले केले हे आम्ही कधीच पाहत नाही, त्याचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होतो. मेल्यानंतर स्वर्गात जाण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा जेथे राहतो तेथे स्वर्ग का नाही बनवत आपण... पॉझिटिव्ह विचार सगळ्यांनी ठेवले तर पाहा काय बदल होतात ते... मात्र सगळ्यांना पुढे जाण्याची घाई झाली आहे...
पण समाजात सगळ्यांनाच प्रगती करायची आहे. आपण कसे कोणाला रोखू शकतो?
अगदी खरंय... तुम्हाला पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी कोणीही कधी अडवलेले नाही. पण मी किती पुढे गेलो याहीपेक्षा दुसरे माझ्यापेक्षा किती पुढे गेले याचा आम्हाला जास्त त्रास होत असतो. या त्रासातूनच जो आमच्या पुढे गेला आहे त्याच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यातच आम्ही जास्त रमत जातो. धर्माच्या क्षेत्रात, राजकारणात आणि आमच्या व्यक्तिगत आयुष्यातही हाच त्रास आम्हाला जगू देत नाही. हम दुसरों की अच्छार्इंयोंका समांन नही करेंगे तो हमारी अच्छार्इंयां भी दुसरोंके रास नही आयेंगी... जग चांगले वागेल न वागेल याचा विचार न करता मी चांगला वागेन, हाच विचार सगळ्यांनी केला तर जग चांगले होण्यास वेळ लागणार नाही...
एक महिला साध्वी, आचार्या होते आणि त्या भौतिक सुखाची साधनं वापरतात. त्यावर टीका होते. याकडे आपण कसे पाहता..?
अनेक वर्षांनंतर काही साध्वी आपल्या हातानी वृक्षारोपण करत आहेत, एका सामाजिक संस्थेत वैद्यकीय सेवा देत आहेत, प्रशासन सांभाळत आहेत, पैशांचे व्यवहार सांभाळत आहेत, ज्या साध्वींना मोबाइलवर बोलण्यास मनाई केली आहे त्या आता ड्रायव्हिंग करत आहेत, विदेशात जात आहेत... साध्वीजी सामाजिक काम करत आहेत, दु:खी व्यक्तींची आसवं पुसण्याचे काम करत आहेत आणि हा पुरुषप्रधान समाज त्यांना हे सगळे करू देत आहे... इससे बडी बात और क्या हो सकती है... धर्माला वैज्ञानिक रूप द्यावेच लागेल. बदलत्या काळानुरुप याकडे पाहावे लागेल...
धर्माला वैज्ञानिक रूप द्यावे लागेल म्हणजे काय करावे लागेल..?
कोणत्या साध्वींनी विमानात बसावे की नाही, फोन वापरावा की नाही या तर फार पुढच्या गोष्टी आहेत. पण आम्ही तेल, तूप, मैदा, जंकफूड खाऊ शकतो आणि भाजीपाला नाही खाऊ शकत हा विचार आता
बदलावा लागेल. अमेरिकेत मी एका प्रवचनात हा विचार मांडला. जंकफूड, मिठाई, तूप आणि तुपाचे पदार्थ, साखरेचे अतिसेवन सोडून द्या आणि भाजीपाला खा, असे त्या ठिकाणी सांगितले. आरोग्याकडे दुर्लक्ष करत आम्ही ज्या गोष्टी खायला पाहिजेत त्या खाऊ नका म्हणतो हे काही योग्य नाही. यातून दंभ, पाखंड या गोष्टीच वाढतील... धर्माला वैज्ञानिक रूप द्यायचे म्हणजे यापेक्षा वेगळे काय असेल...
धर्म आणि राजकारण... याबद्दल काय सांगाल..?
धर्माला राजकारणापासून दूर ठेवावेच लागेल. तरच त्यातून चांगले काही निघेल. धर्म जोडण्याचे काम करतो, राजकारणाविषयी मी काय सांगणार? मी हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या मुलांना शिकवण्याचे
काम केले आहे. धर्म कधी तोडण्याची भाषा करत नाही. प्रेम और करुणा
से बढकर कोई धर्म नही
होता... मनुष्यजातीला शेकडो वर्षे झाली पण अजूनही आम्हाला त्याच त्या प्रश्नांनी घेरून टाकलेले आहे. प्रत्येकानी आपापल्या परीने प्रयत्न नक्कीच केले; पर आजभी मनुष्य सही राह की तलाश में घुम रहा है... हा शोध थांबायला हवा... माणुसकीचा झरा वाहायला हवा... यापेक्षा जास्त काय सांगू....
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा सगळ्यात गंभीर विषय बनलेला आहे. अनेक साधू-संतांनीदेखील या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले. आपण काय सांगाल...?
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत पीडादायक बाब आहे. आरोग्य, शेती, शिक्षण या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिल्या पाहिजेत. पीडित शेतकरी जे अन्नधान्य पिकवतो ते आम्हाला कसले सुख आणि आनंद देणार..? आम्हाला या विषयावर राजकारण करणे महागात पडेल. मूलभूत प्रश्नांना रंग देऊन आम्ही फार मोठी चूक करत आहोत. त्यातून तयार होणारे प्रश्न आम्हाला कायम नुकसानच देतील...