समुद्राच्या पाण्याला शास्त्रज्ञांनी बनवलं पिण्यायोग्य
By admin | Published: May 6, 2016 09:30 PM2016-05-06T21:30:03+5:302016-05-06T21:40:33+5:30
शास्त्रज्ञांनी समुद्राचं पाणी साफ करण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलं
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6- समुद्राचं पाणी मुळातच खूप खारट असतं. तोंडात गेल्यास अनेकांच्या जिभेची चव बिघडते. मात्र हे समुद्राचं खारट पाणीच काही शास्त्रज्ञांनी चक्क पिण्यायोग्य बनवलं आहे. महाराष्ट्रात पाण्यावाचून भीषण दुष्काळ पडला असतानाच शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाचं सर्वच स्तरांतून कौतुक होतं आहे. या प्रयोगानुसार शास्त्रज्ञांनी जवळपास 63 लाख लिटर खा-या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचं गोड्या पाण्यात रूपांतर केलं आहे.
एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी समुद्राचं पाणी साफ करण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याच्या मदतीनं आर्सेनिक आणि युरेनियमनं युक्त जमिनीखालच्या पाण्यालाही पिण्यालायक बनवता येईल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. सध्या तमिळनाडूतील कल्पक्कुम येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जातो आहे. पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान इथंही हा प्रयोग राबविणार असल्याची माहिती भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक के. एन. व्यास यांनी दिली आहे.