ऐन गणेशोत्सव काळात सामान्यांच्या खीशाला कात्री; फळे, भाज्या महागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:51 AM2020-08-24T01:51:19+5:302020-08-24T07:12:41+5:30
कोरोनामुळे त्रस्त नागरिकांच्या अडचणीत भर
दासगाव : ऐन गणेशोत्सवाच्या काळात फळे आणि भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. गेले काही महिने कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची स्थिती होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, आजही अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय, लघू उद्योग बंद असल्याने अनेक जण घरीच आहेत. अर्थचक्रही कोरोना संक्रमण काळात मंदावल्याने हातात पैसा उरलेला नाही. अशातच किराणा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे यांची आवकही कमी होत असल्याने आणि सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम दरावर झाला आहे. यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर ऐन गणेशोत्सवात कडाडले आहेत. हातात पैसा नसतानाच अनेक जणांनी गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याकडे कल दिला असला, तरी घरात लागणारे धान्य, भाजीपाला, पूजेला लागणारी फळे, चांगलीच महागली आहेत.
पूजेला लागणारा केवडाही २० ते २५ रुपये नग, पपनस फळ ६० ते ७० रुपये नग या दराने विकला जात आहे. कोथिंबीर जुडी तब्बल ५० रुपयांवर गेली आहे. गोंडाही बाजारात आवक कमी झाल्याने २०० रुपये किलोने विकला जात आहे. गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने बाजारात भाजी येत नसल्याचे भाजीपाला विक्रेत्याने सांगितले, शिवाय येणारी भाजीही अनेकदा लवकर सततच्या पाण्यामुळे कुजत असल्याने हा फटकाही सहन करावा लागत आहे. महाडमध्ये भाजीपाल्याचे आणि फळांचे दर वाढले असले, तरी ग्रामीण भागातून येणारी भाजी मात्र अजून तरी आवाक्यात असल्याने हा भाजीपाला ग्राहकांना आधार ठरत आहे.
सततचा पावसामुळे भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवात दर वाढल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच दर पूर्वपदावर येतील, अशी आशा आहे. - रज्जाक करबेलकर, भाजी विक्रेता, पोलादपूर
भाज्यांचे दर
गवार ८०
टोमॅटो ५०
मटार १२०
पावटा ६०
कोबी ८०
फ्लॉवर ८०
मिरची ३०
आले १२०
कांदापात ३०
कोथिंबीर ५०
(दर प्रतिकिलो)