नोटा बदलीच्या रॅकेटची व्याप्ती मोठी

By admin | Published: December 21, 2016 11:22 PM2016-12-21T23:22:39+5:302016-12-21T23:22:39+5:30

कोल्हापुरात व्यापाऱ्यांच्या घरांवर छापे : रॅकेट उखडून टाका : नांगरे-पाटील यांचे आदेश

The scope of the no-exchange racket is big | नोटा बदलीच्या रॅकेटची व्याप्ती मोठी

नोटा बदलीच्या रॅकेटची व्याप्ती मोठी

Next

कोल्हापूर : जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून देणारे रॅकेट मोठे आहे. व्यापाऱ्यांबरोबर काही बँकांचे कर्मचारी यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे मूळ उखडून टाका, असे आदेश कोल्हापूर-सातारा पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
६० लाख रुपयांच्या नव्या चलनातील नोटा देण्यासाठी प्रयत्नात असणाऱ्या ‘त्या’ राजारामपुरीतील दोघा व्यापाऱ्यांच्या घरांवर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास छापे टाकले. ही कारवाई सातारा पोलिसांनी केल्याचे समजते. आणखी काही रक्कम सापडते का, याची खातरजमा करण्यासाठी घरातील कोपरान्कोपरा शोधून काढला. संशयित व्यापारी सागर दत्तात्रय आरडे (वय ४५, रा. राजारामपुरी १० वी गल्ली) व भगवान बिराप्पा भोपळे (५०, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली) हे सिमेंट विक्रीचे होलसेल व्यापारी आहेत. दोन-चार तास बँकेच्या रांगेत उभे राहून दोन हजार रुपयांच्या नोटेवर लोकांना समाधान मानावे लागते. अशा गंभीर परिस्थितीत या व्यापाऱ्यांकडे नवीन चलनातील ६० लाख रुपये आले कोठून? कोणत्या बँकेने त्यांना पैसे दिले? यासंबंधीची सातारा पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्यासह आठ ते दहा व्यापाऱ्यांची ही रक्कम असल्याचे तपासात पुढे आले आहे. या नोटांवरील सीरियल नंबर एकसारखे नसल्याने त्या विविध बँकांतून काढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी हाताशी घेतले आहे. या बँका कोणत्या आहेत? ते रक्कम कोणाला देणार होते? याची संपूर्ण माहिती पोलिस घेत असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, या दोघांकडे मोठी रक्कम असल्याचे ऐकून नातेवाइकांनाही धक्का बसला. पोलिसांनी दोघांच्याही पत्नी, मुलांकडे पैशांसंबंधी विचारणा केली. मात्र, त्यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. या दोघांच्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून अनेक बड्या व्यापाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. त्याबाबत गोपनीयता पाळली आहे. प्रसिद्ध बँकाही पोलिस रेकॉर्डवर आल्या आहेत. सातारा आयकर विभाग व पोलिस संयुक्त तपास करीत आहेत. दोघांना अटक झाल्यापासून बुधवारी दिवसभर त्यांच्या पै-पाहुण्यांची घराकडे गर्दी वाढली होती.

व्यापाऱ्यांची ओळख...
सागर आरडे याचा राजारामपुरी दहाव्या गल्लीत, तवनाप्पा पाटणे हायस्कूलच्या शेजारी तीन मजली आलिशान बंगला आहे. बंगल्याच्या सुरुवातीस त्याचे सिमेंट विक्रीचे ओम शांती एजन्सी कार्यालय आहे. त्याचा मित्र भगवान भोपळे याचे राजारामपुरी १३ व्या गल्लीमध्ये प्रशस्त ‘प्रभूछाया’ नावाचे जुने घर आहे. याठिकाणी अपार्टमेंट बांधण्याचे त्याचे नियोजन आहे. बाजारभावानुसार या जागेची करोडो रुपये किंमत आहे. तो सुरुवातीला बकऱ्यांच्या चमडी विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यानंतर मित्र आरडे याच्याकडून सिमेंटची एजन्सी घेऊन जुन्या घरातील दुकानगाळ्यात राज ट्रेडर्स नावाचे कार्यालय सुरू केले. गेल्या दीड वर्षापासून तो याच परिसरात आय. ए. सांगावकर यांच्या घरी भाड्याने राहतो.


रोकड आयकर विभागाकडे; दोघांची सशर्त सुटकासातारा : तीस टक्के कमिशन घेऊन जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देणाऱ्या रॅकेटमधील तिघांकडून जप्त केलेली साठ लाखांची रोकड बुधवारी आयकर विभागाने ताब्यात घेतली. सविस्तर चौकशीचा अहवाल हाती आल्यानंतरच त्या संशयितांवर
‘मनी लॉड्रिंग’चा गुन्हा दाखल होऊ शकतो.
संबंधित तिघा संशयितांना कोल्हापूर येथे हजेरी लावण्याच्या अटीवर सोडण्यात आले असून, एवढी मोठी रक्कम कोठून आली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये कारमधून रक्कम घेऊन आलेल्या सागर दत्तात्रय आरडे (वय ४५), भगवान बिराप्पा भोपळे (५०, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), उमेश मधुकर कांबळे (४८, रा. कोेळे, ता. कऱ्हाड) यांना मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या तीन हजार नोटा असे साठ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. जिल्ह्यातील ही पहिलीच
मोठी कारवाई असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
पोलिसांनी आयकर विभागाला कळविल्यानंतर बुधवारी दुपारी आयकर विभागाने सर्व रक्कम आपल्या ताब्यात घेतली. तिघा संशयितांना कोल्हापूर येथे नेण्यात आले. जोपर्यंत ही रक्कम नेमकी कोठून आली. हे पुढे येत नाही तोपर्यंत त्यांना तेथील पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.

Web Title: The scope of the no-exchange racket is big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.