दूध खरेदी दरावरून पेच, पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:59 AM2018-05-07T04:59:43+5:302018-05-07T04:59:43+5:30
दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मुंबई - दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेतकरी संप आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध खरेदी दरात वाढ केली होती. ग्राहकांवर अतिरिक्त बोजा न टाकता गायीचे दूध २७ तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रति लीटर अशी एकूण तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढीव दर देता येणार नसल्याचे सांगत राज्यातील दूध संघांनी दूधाचे संकलन बंद करून आंदोलन करण्याचाच इशारा दिला होता. त्या वेळी सरकारने बैठका घेत विषय तात्पुरता मिटवला होता. मात्र, दूध खरेदी दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. सध्या औरंगाबाद येथील शेतकºयांनी मोफत दूध देण्याचा मार्ग अवलंबिला आहे. तर किसान महासंघाने दूधपुरवठा बंद करत पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे. दुधाच्या खरेदी दरावर राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हमीभाव नसताना दुधाच्या खरेदी दरात वाढ शक्य. एकतर सरकारने दुधाचे दर वाढवावेत किंवा खरेदी दरातील वाढीसाठी दूध संघांना अनुदान द्यावे, अशी दूध संघांची भूमिका आहे. राज्यातील बहुतांश दूध संघांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राज्य सरकारची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी ‘आरे’ हाच एक ब्रँड बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. मात्र, त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. राज्यात रोज तीन कोटी लीटर दुधाची आवश्यकता असताना उत्पन्न मात्र ७५ लाख लीटर इतकेच आहे. मात्र, एकीकडे दुभत्या जनावरांवरील खर्च वाढत असताना खरेदी दरातील घसरणीमुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.