पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर संजय राऊतांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 11:04 AM2023-03-24T11:04:33+5:302023-03-24T11:04:57+5:30
जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी खेळी सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला.
नाशिक - महाराष्ट्रातला वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरे जायचे अशी पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंसह भाजपावर राऊतांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना घाबरल्यामुळे या हालचाली सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंना ज्याप्रकारे लोकांचा पाठिंबा मिळतोय हे पाहून भाजपा आणि त्यांचे बगलबच्चे घाबरले आहेत. त्यामुळे जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे. परंतु पडद्यामागची ही पटकथा लोकांसमोर आली आहे. त्यामुळे या पटकथेला जनमानसामध्ये स्थान मिळणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
रस्ता वेगळा करता आला तर पाहू
फडणवीस-ठाकरेंसाठी रस्ता वेगळा करता आला तर पाहू. विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच आहे. त्यामुळे या अफवांना अर्थ नाही असं संजय राऊत यांनी सांगत फडणवीस-ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. त्याचसोबत शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत. आम्ही स्वतंत्र आहोत. आमचा पक्ष आमच्या पायांवर उभा आहे. दुसऱ्याची डोकी आम्हाला लागत नाही असं सांगत राऊतांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
आधी निवृत्ती पत्करा, मग चौकशीला सामोरे जा
मंत्री दादा भूसे यांच्या गिरणा एग्रो कंपनीने १७५ कोटी शेतकऱ्यांकडून गोळा केले आणि प्रत्यक्षात दीड कोटी दाखवण्यात आले. दादा भूसेंच्या दाढीला आग लागण्याचं कारण नव्हते. मोठ्या आवेशात ते विधिमंडळात बोलत होते पण त्यांचे पाय खाली थरथरत होते. दाढीला घाम फुटला होता अशा शब्दात संजय राऊतांनी भूसेंना टार्गेट केले. त्याचसोबत मी मालेगावात जात आहे. त्यावेळी तेथील काही शेतकरी मला भेटणार आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या पैशांचा हिशोब आम्ही मागतोय असंही राऊत म्हणाले. २६ मार्च रोजी मालेगाव येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे त्याच्या तयारीसाठी संजय राऊत नाशिक, मालेगाव दौऱ्यावर आहेत.