जुन्या नाटकांच्या संहिता ई-लायब्ररीद्वारे उपलब्ध होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:09 PM2019-08-22T13:09:27+5:302019-08-22T13:13:56+5:30
आता प्रादेशिकसह इतर भाषिक दिग्दर्शकांची ही अडचण दूर होणार आहे.
- नम्रता फडणीस-
पुणे : मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होते; पण एखाद्या दिग्दर्शकाला इंग्रजीमधील नाटक मराठीत आणायचे असेल किंवा हिंदीमध्ये ते सादर करायची इच्छा असेल, तर त्या नाटकाच्या ‘संहिता’ मिळणार कुठं, हाच मोठा प्रश्न असतो; पण आता प्रादेशिकसह इतर भाषिक दिग्दर्शकांची ही अडचण दूर होणार आहे. बीइंग असोसिएशन, मुंबई या संस्थेतर्फे हिंदी रंगभूमीवरील दर्जेदार नाटकांबरोबरच जुन्या नाटकांच्या निवडक संहिता ‘ई-लायब्ररी’च्या माध्यमातून दिग्दर्शकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आजमितीला संस्था तब्बल तीनशे हिंदी नाटकांचा संग्रह करण्यात यशस्वी ठरली आहे.
मुंबईची बीइंग असोसिएशन ही संस्था २०१७ पासून दर वर्षी राष्ट्रीय स्तरावर ‘संहितामंच’ या नाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेद्वारे संस्थेमार्फत देशभरातून स्वलिखित नाटके मागवली जातात आणि नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ, दिग्गज मंडळी या सर्व नाटकांमधून तीन सर्वश्रेष्ठ नाटके निवडतात. विशेष म्हणजे, ही निवड झालेली नाटके संस्था पुस्तकरुपात प्रकाशित करून, तरुण दिग्दर्शकांकडून ती दिग्दर्शित देखील केली जातात. वेगवेगळ्या शहरात या नाटकांचा महोत्सव भरविला जातो.
या अभिनव उपक्रमाबद्दल बीइंग असोसिएशनच्या दिग्दर्शिका रसिका आगाशे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाल्या की, आम्हाला दर वर्षी हिंदी रंगभूमीसाठी एक वेगळं नाटक हवं असतं. दोन वर्षांपूर्वी शोध घेऊनही ते काही केल्या मिळत नव्हतं. कुणी नाटकचं लिहीत नाहीये का, असं आम्हाला वाटलं. मग यासाठी ‘स्पर्धा’ घेण्याचं ठरवलं आणि त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. हे पाहिल्यानंतर कुणी लिहीत नाहीये का? तर असं नाही. फक्त त्यांना व्यासपीठ मिळत नाहीये हे जाणवलं. समांतर रंगभूमीसाठी कोणं कोणं काम करतयं याची माहिती देखील प्रादेशिक भाषांमधील कलाकारांना नसते. प्रत्येक जण आपापली नाटकं करण्यात मग्न असतो. ही स्पर्धा आयोजित केल्यानं मलाही दर वर्षी जे नवीन नाटक करायचं होतं ते करायला मिळालं आणि माझ्या मित्रांनाही यामध्ये जोडून घेतलं. यामुळे वेगवेगळ्या लेखकांची नाटकं वेगवेगळया दिग्दर्शकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
......
संस्थेकडे हिंदी नाटकांच्या ३०० संहिता
संस्थेकडे हिंदी नाटकांच्या तीनशे संहिता उपलब्ध आहेत. त्यातील निवडक संहिता ‘ई-लायब्ररी’ माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यातच जुन्या संहितादेखील वाचायला मिळत नाहीत आणि त्या पुनर्प्रकाशितदेखील केल्या जात नाहीत.
यासाठी आम्ही १५० जुन्या नाटकांच्या संहिता जमा केल्या आहेत. त्यादेखील ऑनलाइन पाहता येणार आहेत. हळूहळू सर्व भाषांमधील लेखकांशी बोलून त्यांच्या संहिता उपलब्ध करून दिल्या जातील. संस्थेकडून लेखकांना मानधन दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्या त्या शहरात जाऊन नाटककारांशी बोलून त्यांचे डॉक्युमेंटेशनही आम्ही करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
........