‘अब्रूरक्षणा’साठी धावाधाव
By admin | Published: June 30, 2017 03:21 AM2017-06-30T03:21:09+5:302017-06-30T03:21:09+5:30
मुंबई हागणदारीमुक्त झाल्याच्या दावा करणाऱ्या महापालिकेवर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर ‘अब्रूरक्षणा’साठी मुंबई महापालिकेने धावाधाव सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई हागणदारीमुक्त झाल्याच्या दावा करणाऱ्या महापालिकेवर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर ‘अब्रूरक्षणा’साठी मुंबई महापालिकेने धावाधाव सुरू केली आहे. या योजनेचा फज्जा उडू नये, यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार एक हजार २१५ शौचाकूपांचे लोकार्पण ३० जून रोजी करण्यात येणार आहे.
मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासन सातत्याने करत असली तरीदेखील प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. मुंबई शहरापासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही कित्येक वस्त्या अशा आहेत; जिथे शौचालयाची वानवा आहे. परिणामी अशा वस्त्यांमधील रहिवाशांना समुद्रकिनारी, रेल्वे ट्रॅकलगत आणि खाडीसह मिठी नदीच्या किनारी उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. या कारणास्तव राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांकडून ‘हागणदारीमुक्त मुंबई मोहिमे’वर कडाडून टीका केली जात आहे. परंतु या टीकेला प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र आहे. हागणदारीमुक्त मोहिमेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ३० जून रोजी दुपारी १२ वाजता ८३ शौचालयांचे एकाच वेळी लोकार्पण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ८३ शौचालयांमध्ये एकूण १ हजार २१५ शौचकुपे उपलब्ध होणार आहेत.
सार्वजनिक शौचालयांचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महापालिकेद्वारे सातत्याने विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत पथनाट्यांचे सादरीकरण करणे, भित्तीपत्रकांच्या माध्यमातून संवाद साधणे; तसेच वस्तीपातळीवर प्रत्यक्ष चर्चात्मक संवाद करणे, या बाबींचा समावेश आहे.