स्टाइलबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केसांना कात्री

By admin | Published: July 1, 2017 03:06 AM2017-07-01T03:06:30+5:302017-07-01T03:06:30+5:30

हीरोगिरी करतो का? असे म्हणत शाळेतील शिक्षकाने पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून त्यांचे केस कापल्याची विचित्र घटना विक्रोळीत घडली.

Sculptor | स्टाइलबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केसांना कात्री

स्टाइलबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या केसांना कात्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हीरोगिरी करतो का? असे म्हणत शाळेतील शिक्षकाने पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून त्यांचे केस कापल्याची विचित्र घटना विक्रोळीत घडली. शिक्षकाच्या या अजब शिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच त्यांनी शाळेला घेराव घातला. शाळेतील संचालकाच्या मुलाच्या आदेशावरून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले. पालकांच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी शाळेतील संचालकाचा मुलगा गणेश बट्टा याच्यासह पीटीचे विक्षिप्त शिक्षक आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
विक्रोळी पूर्वेकडील टागोर नगर क्रमांक ४मध्ये कमलताई वासुदेव वायकर (के.वी.वी.) या शाळेत एकूण नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमाचे वर्ग येथे भरतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग भरले. मात्र पहिल्याच तासाला पीटीचे शिक्षक मिलिंद झणके वर्गात आले. त्यांनी पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गातील केस वाढविलेल्या मुलांना वर्गाबाहेर काढले. त्यानंतर वर्गाबाहेरच बाकडा टाकून शिपाई तुषार गोरेला हाताशी घेऊन विद्यार्थ्यांचे ओबडधोबड पद्धतीने केस कापण्यास सुरुवात केली. अहो सर सोडाना.. उद्या केस कापून येतो... अशी विनवणी विद्यार्थ्यांकडून सुरू होती. मात्र जास्त हीरो बनता का? शिस्त पाळायला नको.. असे म्हणत शिक्षक त्यांचे केस कापत होता. यादरम्यान काही विद्यार्थ्यांना कैचीही लागली. हे पाहून अन्य शिक्षकांच्याही भुवया उंचावल्या.
केस कापलेले विद्यार्थी तोंड लपवत वर्गात जाऊन बसले. मात्र अन्य विद्यार्थ्यांकडून त्यांची खिल्ली उडविण्यात आली. ते वर्गातच रडायला लागले. दुपारी शाळा सुटल्यानंतर त्यांनी घर गाठले. मुलगा रडत आल्याने पालकांचीही चिंता वाढली होती. मुलांना अशा अवस्थेत पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी याबाबत अधिक विचारणा करताच विद्यार्थ्यांनी पीटीच्या सरांच्या विक्षिप्तपणाला वाचा फोडली. तेव्हा पालकांनी शाळेला घेराव घातला. याबाबत शिक्षकाकडे जाब विचारला असता, संचालक डी.ए. बट्टा यांचा मुलगा गणेश याच्या आदेशावरून त्याने हे केल्याचे सांगितले.
घटनेची वर्दी लागताच विक्रोळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी झाणगे आणि गोरेला पोलीस ठाण्यात आणले. तेथे पालक सचिन भीमराव पवार यांच्या तक्रारीवरून गणेश बट्टा, मिलिंद झाणके, तुशार गोरे यांच्याविरुद्ध ३२५, ३५५, ३४, ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी झाणके आणि गोरेला अटक करत गणेशला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे श्रीधर हंचाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पट्ट्यावरही बंदी : शाळेतील मुले बेल्टचा वापर करून भांडण वगैरे करू नये म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरपट्ट्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सर.. सुने ही नही...
सकाळी शाळेत आलो. तेव्हा केस पकडून सरांनी आम्हाला वर्गातून बाहेर काढले. त्यांना विनंती करूनही त्यांनी माझ्या मित्रांसमोर माझे वेडेवाकडे केस कापले. सर को बहोत समझाया मगर ओ सुनेही नहीं.. असे सातवीच्या विद्यार्थ्याने सांगितले.
माझा मुलगा असा करणारा नाही...-
याबाबत शाळेचे संचालक डी.ए. बट्टा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणात आपल्या मुलाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. हे राजकीय षड्यंत्र असल्याचे संशय आहे.
तसेच २९ वर्षांत पहिल्यांदाच अशी विचित्र घटना घडली. याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी शाळेतील शिपायाने मुलांना केस कापण्याची सूचना केली होती. मात्र त्यासाठी असा मार्ग वापरणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनही अधिक चौकशी करत आहे.
सरांनी असे का केले..
शाळेत बसतानाही लाज वाटत होती. शाळेतील शिक्षकही हसत होते. मी खूप रडलो. अशा शिक्षकांवर कारवाई व्हायला हवी, असे मत नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Sculptor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.