सांगलीच्या शिल्पकाराचे शिल्प ‘युनो’मध्ये विराजमान

By admin | Published: April 19, 2016 07:42 PM2016-04-19T19:42:12+5:302016-04-19T19:42:12+5:30

सांगली जिल्ह्यातील कडेगावचे शिल्पकार चंद्रजित यादव यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे लवकरच अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघात (युनो)

The sculptor of Sangli's architect, 'Uno', sits in | सांगलीच्या शिल्पकाराचे शिल्प ‘युनो’मध्ये विराजमान

सांगलीच्या शिल्पकाराचे शिल्प ‘युनो’मध्ये विराजमान

Next

सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगावचे शिल्पकार चंद्रजित यादव यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे लवकरच अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघात (युनो) अनावरण होणार आहे. दि. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीवेळी याच शिल्पाची युनोच्या मुख्यालयात मिरवणूकही काढण्यात आली. केवळ बारा दिवसात तयार केलेल्या या सुंदर शिल्पामुळे यादव यांच्या कलेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जगभर साजरी करण्यात आली. १७० देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनोमध्येही त्यांना अभिवादन करण्यात आले. मात्र याच युनोमध्ये अनावरण होत असलेले आणि जयंतीदिनी तिथे मिरवणूक काढण्यात आलेले डॉ. आंबेडकरांचे शिल्प मूळच्या कडेगावच्या, पण सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या चंद्रजित यादव यांनी बनविलेले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती!
यादव येथील कलाविश्व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. ते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असून, त्यांनी केवळ बारा दिवसात हे शिल्प तयार केले आहे. १७० देश सदस्य असलेल्या युनोमध्ये अजूनही भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व नाही. मात्र तेथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी युनोमध्ये डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या आंबेडकरांचे शिल्प युनोमध्ये असावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यास परवानगी मिळाल्यानंतर हा पुतळा देण्याची जबाबदारी मुंबईतील कल्पना सरोज फाऊंडेशनने उचलली होती.
हे शिल्प तयार करण्यासाठी चंद्रजित यादव यांचे नाव माजी आयुक्त आर. डी. शिंदे यांनी या फाऊंडेशनला सुचविले. या प्रस्तावानुसार अर्धपुतळा तयार करण्यासाठी केवळ बारा ते तेरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, इतक्या कमी वेळात यादव यांनी अत्यंत सुबक आणि आकर्षक पुतळा तयार केला आहे. विटा येथील व औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही यादव यांनीच तयार केला आहे. आता कोकणातील लोणेरे तंत्रशिक्षण विद्यापीठासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १४ फुटी पुतळा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व शिल्पातून मांडणार
अत्यंत बुध्दिमान आणि ज्ञानाचा प्रचंड खजिना असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे शिल्प एकाच पठडीत असल्याचे दिसून येते. मात्र, आंबेडकरी जनतेने जर बदल स्वीकारले, तर डॉ. आंबेडकरांना शिल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दाखविण्याचा प्रयत्न असल्याचेही चंद्रजित यादव यांनी सांगितले. आंबेडकरांचे राहणीमान स्वच्छ, निर्मळ आणि उच्चकोटीचे असल्याने त्यांना या रूपातही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब उतरविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

असामान्य बुध्दिमत्तेने जगावर छाप पाडणाऱ्या आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे शिल्प बनविणे, हे मी माझे भाग्य समजतो. युनोचे सदस्यत्वही अजून आपल्याला मिळाले नसताना, मी तयार केलेले शिल्प तेथे विराजमान झाले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांचे उच्चकोटीचे व्यक्तिमत्त्व शिल्पाच्या माध्यमातून उतरविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे.
- चंद्रजित यादव, शिल्पकार

Web Title: The sculptor of Sangli's architect, 'Uno', sits in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.