‘सी-प्लेन’ पहिल्यांदा नागपुरात उडणार
By Admin | Published: June 16, 2017 01:10 AM2017-06-16T01:10:31+5:302017-06-16T01:10:31+5:30
विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) नागपूर येथे सी-प्लेन सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) नागपूर येथे सी-प्लेन सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाजनको आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून नागपूर-ताडोबा आणि नागपूर-शेगाव येथील जलाशयात ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू करण्यात येईल. या कामासाठी एमएमबीने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.
केंद्राच्या पर्यटनवाढीला पोषक ठरणाऱ्या उपक्रमांतर्गत राज्य सरकारने वर्षभरापूर्वी ‘सी-प्लेन’ योजना मांडली होती. त्यामध्ये पहिल्यांदा मुंबईत हा प्रकल्प राबविण्याचा विचार होता, मात्र आता नागपुरातून त्याचा ‘श्रीगणेशा’ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नागपुरातील जलाशय, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, ताडोबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे या ‘सी-प्लेन’मुळे आकर्षण वाढेल, त्यामुळे तेथील पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
केंद्र सरकारच्या जहाज बांधणी मंत्रालयाने सागरमाला उपक्रमांतर्गत नागपूर-ताडोबा, शेगाव येथे सी-प्लेन सुरू करण्याचा विचार मांडला होता. त्या धर्तीवर एमएमबीने नागपूर सुधार प्रन्यास आणि महाजनकोच्या माध्यमातून सी-प्लेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाजनकोचे कोराडी येथे थर्मल पॉवर स्टेशन आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सी-प्लेनचा थरार अनुभवता येईल. मध्यवर्ती हब बनू पाहणाऱ्या नागपूरच्या शिरपेचात सी-प्लेनमुळे मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
नागपूर येथे पर्यटकांच्या आकर्षणासाठी सी-प्लेन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला कोराडी (थर्मल पॉवर स्टेशन) येथील सी-प्लेन सुविधेसाठी निविदादेखील मागविल्या आहेत. त्याला प्रतिसाद आला आहे. नागपूरनंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबईत बेलापूर आणि वांद्रे येथेदेखील ‘सी-प्लेन’ सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
- अतुल पाटणे (मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ)