ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील १३ पेट्रोल पंपांना सील
By admin | Published: June 22, 2017 05:21 AM2017-06-22T05:21:38+5:302017-06-22T07:00:57+5:30
कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील १३ पेट्रोल पंपांना आतापर्यंत ठाणे पोलिसांनी सील ठोकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील १३ पेट्रोल पंपांना आतापर्यंत ठाणे पोलिसांनी सील ठोकले आहे. या कारवाईतील आरोपींची संख्या सातवर पोहोचली असून, कारवाईचा धडाका अद्यापही सुरुच आहे.
कमी पेट्रोल देऊन वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरूद्ध ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून कारवाईची मोहीम सुरु केली. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत १३ पेट्रोल पंपांना सील ठोकण्यात आले. यामध्ये शहापूर नजिकचे खर्डी भिवंडी आणि कल्याणमधील पेट्रोलपंपांचाही समावेश आहे. वजन व मापे निरीक्षण विभाग आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सुरु असलेल्या या कारवाईमध्ये पेट्रोल पंपांची तपासणी सुरु आहे. वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी असलेल्या सर्व मशिन्सची तपासणी केली जात असून, ज्या मशिनमध्ये हेराफेरी केल्याचे दिसत आहे, केवळ त्याच मशिनला सील ठोकले जात असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक आयुक्त मुकुंद हातोटे यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत आणखी काही पेट्रोल पंपांवर पोलिसांची कारवाई सुरु होती. त्यामुळे सील ठोकलेल्या पेट्रोल पंपांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पुरवठामंत्र्यांची भेट
पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. बदलापूर आणि शीळफाटा येथील पंपांवर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप यावेळी संघटनेने केली. पोलिसांच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली असून, ते कामावर येत नसल्याने इंधन वाट बंद पडण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. पेट्रोल पंपावरील ज्या मशीनमध्ये हेराफेरी असेल केवळ तीच मशीन सील करण्याऐवजी सर्व मशीन्सला सील ठोकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रभात सिंग, उपाध्यक्ष राजू मुंदडा, सचिव केऊर पारेख आदी उपस्थित होते.