अमरावतीत ‘कॅरीबॅग’ निर्मितीचा कारखाना सील

By admin | Published: September 16, 2016 01:59 AM2016-09-16T01:59:33+5:302016-09-16T01:59:33+5:30

पर्यावरण रक्षणासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पर्यावरण विभागाने कठोर बंदी घातली आहे.

Seal the 'Caribag' manufacturing factory in Amravati | अमरावतीत ‘कॅरीबॅग’ निर्मितीचा कारखाना सील

अमरावतीत ‘कॅरीबॅग’ निर्मितीचा कारखाना सील

Next

अमरावती : पर्यावरण रक्षणासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पर्यावरण विभागाने कठोर बंदी घातली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने येथील एका कारखान्यातून तब्बल ३३०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. हा कारखाना सील करण्याची कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली आहे.
झोन क्र.३ हमालपुरा, झोन क्र.४ बडनेरा दक्षता समिती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने बुधवारी एमआयडीसीमधील आर.जे.पॉलिमर्स या प्लास्टिक पिशव्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड घातली. रोहण चव्हाण यांच्या मालकीच्या या कारखान्यातून निर्मित प्लास्टिक पिशव्या शहरातील बाजारात आणल्या जात असल्याची माहिती महापालिका यंत्रणेला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून शहरातील अनेक प्रतिष्ठानांतून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्या मोहिमेंतर्गत या कारखान्यावर धाड घालण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या कारखान्याला सील लावणार आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशाने पर्यावरण अधिकारी तथा सहायक आयुक्त महेश देशमुख आणि बडनेरा झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांनी ही कारवाई केली.
स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०११ मधील तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा अहवाल दर तीन महिन्यांनी शासनाला सादर करणे अनिवार्य आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी उत्पादन मात्र सुरूच आहे. त्यामुळे पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होत आहे. या पिशव्यांची विल्हेवाट लावणे हीच मोठी समस्या आहे. म्हणूनच दंड आणि त्यापुढे जाऊन फौजदारीशिवाय अन्य पर्याय नाही. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी आणि कागदी पिशव्यांच्या निर्मितीवर भर देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ४३ प्रभागांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी प्रभागस्तरावर पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Web Title: Seal the 'Caribag' manufacturing factory in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.