‘मेपल’चे बँक खाते सील
By admin | Published: April 21, 2016 05:15 AM2016-04-21T05:15:59+5:302016-04-21T05:15:59+5:30
मेपल ग्रुपच्या पाच लाखांत घर देण्याच्या योजनेत फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असून, आॅनलाइन नोंदणीसाठी उघडण्यात आलेले कंपनीचे एक बँक खाते सील करण्यात आले आहे
पुणे : मेपल ग्रुपच्या पाच लाखांत घर देण्याच्या योजनेत फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असून, आॅनलाइन नोंदणीसाठी उघडण्यात आलेले कंपनीचे एक बँक खाते सील करण्यात आले आहे. चौकशीसाठी सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याची नोटीसही संचालकांना बजावण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. दरम्यान, मेपल ग्रुपने आज सायंकाळी या योजनेत ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचे पैसे विनाअट परत करण्याची घोषणा आपल्या वेबसाइटवर केली आहे़
साकोरे यांनी दिलेल्या
माहितीनुसार, या प्रकरणी कंपनीचे संचालक सचिन अशोक अगरवाल, नवीन अशोक अगरवाल, विक्री व्यवस्थापक प्रियांका अगरवाल यांच्यासह कंपनीच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>मेपल ग्रुपने आपल्या वेबसाइटवर केलेल्या घोषणेत म्हटले की, महाराष्ट्र हाऊसिंग डे ही योजना थांबविण्यात आली आहे. यात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत व ज्यांना पैसे परत हवे आहेत, त्यांनी कंपनीच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात सकाळी १०़३० ते सायंकाळी ६़३० या वेळेत यावे़ सोबत पैसे भरल्याची पावती व ओळखीचा पुरावा घेऊन यावे़ ज्यांना आॅनलाइन पैसे हवे आहेत, त्यांनाही ते आॅनलाइन देण्याची सोय करण्यात आली आहे़
>जागा विकता येणार नाही : मेपल ग्रुपने ही योजना
ज्या जागेवर घोषित केली होती़ ती जागा कंपनीला विकता येणार नाही किंवा ती हस्तांतरितही करता येणार नाही, असा आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले़
> गतवर्षीच्या योजनेतही फसवणूक
मेपल ग्रुपने मागील वर्षी राबविलेल्या जन घर योजनेत फसवणूक झाल्याची तक्रार वाई येथील दीपक कांबळे यांनी केली आहे. या योजनेत त्यांनी १ लाख ८० हजार रुपये भरले होते. पण त्यांना सदनिका मिळालेली नाही. पुण्यात सुरू असलेल्या गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुण्यात मेपलचे मुख्य कार्यालय असल्याने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे.