गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का!, कृषी विद्यापीठातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 04:15 AM2020-07-14T04:15:44+5:302020-07-14T04:16:16+5:30
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून शैक्षणिक वर्षाला ‘कोरोना’चा डाग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
- गणेश वासनिक
अमरावती : राज्यात कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून शैक्षणिक वर्षाला ‘कोरोना’चा डाग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या चारही कृषी विद्यापीठांनी बी.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले आहे. यात कृषी, उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका वितरित केल्या जातील.
कृषी पदवी विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका देणे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा ºहास आहे. यात अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. एकाच रांगेत सगळे विद्यार्थी गणले जातील. बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे.
- अनिकेत पजई, विद्यार्थी,
अकोला कृषी महाविद्यालय
कृषी विद्यापीठाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. व्हायवा आॅनलाईन पार पडले आहे. महाविद्यालयातून सुमारे २४० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.
- शशांक देशमुख, प्राचार्य, श्री. शिवाजी कॉलेज आॅफ हॉर्टिक्लचर, अमरावती
- कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांचे फॉरमॅटसुद्धा महाविद्यालयांना पाठविले आहेत. मात्र, ही गुणपत्रिकेचे बी.एस्सी. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना कायम शल्य राहणार आहे.