पिशवीवरील नावावरून घेतला आरोपीचा शोध
By admin | Published: January 29, 2016 02:25 AM2016-01-29T02:25:22+5:302016-01-29T02:25:22+5:30
एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस कधी वेषांतर करतात, तर एका छोट्याशा धाग्यादोऱ्यावरून आरोपीचा शोधही घेतात. अशीच काहीशी कामगिरी मुंबई रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली.
मुंबई: एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस कधी वेषांतर करतात, तर एका छोट्याशा धाग्यादोऱ्यावरून आरोपीचा शोधही घेतात. अशीच काहीशी कामगिरी मुंबई रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली. प्लॅस्टिक पिशवीवरील नावावरून एका खुनातील आरोपीचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेण्यात आला आणि २९ वर्षीय किरण गायकवाड या आरोपीला अटक केली.
२४ जानेवारी रोजी सायंकाळी १६.४५ वाजता दादर-डहाणू शटलसेवा दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर उभी होती. व्यवसायाने कंत्राटदार असलेले हरीश पवार आणि त्यांचा मित्र संतोष भुसारा हे या ट्रेनच्या डब्यात बसले होते. त्याच वेळी प्लॅटफॉर्मवरील बाकावर किरण गायकवाड हा आपल्या मैत्रिणीसोबत बसला होता. हरीश याने आपल्या मोबाइलमधून किरणसोबत असलेल्या मुलीचा फोटो काढला. हा प्रकार पाहताच किरणने ट्रेनमध्ये जाऊन हरीशला जाब विचारला आणि मोबाइल खेचून हरीशला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर किरण हा ट्रेनमधून उतरून निघून गेला. हरीशला मारहाण झाल्याने बराच त्रास होऊ लागला आणि प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू
झाला.
या वेळी त्याच्यासोबत असलेल्या संतोष भुसारा याने मुंबई सेंट्रल जीआरपीमध्ये तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेतील पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या वेळी दादर येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये किरणसोबत असलेली मुलगी आणि एक अनोळखी मुलगा स्टेशनच्या पुलावर बोलत असताना दिसले आणि तिच्या हातात कपडे खरेदी केलेली प्लॅस्टिकची पिशवी होती. त्या पिशवीवर ‘इझी बाय’ असे नाव नमूद होते. इंटरनेटच्या माध्यमातून या नावाचा शोध घेतला असता, विरार, बोरीवली, सांताक्रुझ, विलेपार्ले आणि वांद्रे या ठिकाणी अशा प्रकारची दुकाने असल्याचे निदर्शनास आले.
त्यात प्रथम विरार येथील ‘इझी बाय’ नावाच्या दुकानात जाऊन सीसीटीव्ही फुटेजमधील मुलगी दाखविली असता, तिला ओळखत असल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात आले. त्यानुसार त्या मुलीचा फोननंबर दुकानदाराकडून घेऊन, अधिक चौकशी केल्यावर आरोपी किरणला तत्काळ डहाणू येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, सहायक पोलीस निरीक्षक किरत मतकर यांसह अन्य पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला.