नंबरप्लेटच्या तुकड्यांवरून आरोपीचा शोध
By admin | Published: February 18, 2015 01:13 AM2015-02-18T01:13:13+5:302015-02-18T01:13:13+5:30
नेरूळमध्ये एका वृद्धाला धडक दिल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या तपासानंतर एका महिला डॉक्टरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
नवी मुंबई : नेरूळमध्ये एका वृद्धाला धडक दिल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या तपासानंतर एका महिला डॉक्टरला अटक करण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळावर मिळालेल्या नंबरप्लेटच्या तुकड्यांच्या आधारे पोलिसांनी शिताफिने या अपघाताचा उलगडा केला आणि मंगळवारी डॉ. पद्मा प्रिया यांना सीवूडमधून अटक केली.
नेरुळ येथील शिवाजी चौकात १७ डिसेंबर रोजी हा अपघात झालेला. नेरुळचे राहणारे एन. एम. मनी कंडक (५०) हे स्कुटीवरून (एमएच ४३-एम ७५२४) जात असताना त्यांना कारने धडक दिली. या अपघातात कंडक हे गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांना मदत न करता कारचालकाने कारसह तेथून पळ काढला होता. या अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी कंडक यांना रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने ते बचावले. याप्रकरणी फरार कारचालकाविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांना घटनास्थळी कारच्या नंबरप्लेटचे काही तुकडे आढळले होते. हे तुकडे एकत्र जोडून पोलिसांनी काही संशयित नंबरप्लेट तयार केल्या होत्या. त्याद्वारे अनेक वाहनांचा शोध घेऊन सखोल तपासाअंती फरार कारचालक महिलेला अटक केली. डॉ. पद्मा प्रिया असे या कारचालक महिलेचे नाव असून त्या नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयातील डेन्टीस्ट आहेत. जखमीला मदत करण्याऐवजी या महिला डॉक्टरने तेथून पळ काढला होता.(प्रतिनिधी)
च्काळ्या रंगाची कार आणि नंबरप्लेटचे काही तुकडे केवळ एवढीच माहिती पोलिसांपुढे होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक मंगेश पालांडे, जगवेंद्रसिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक पूनम बागल यांनी नंबरप्लेटचे तुकडे जोडून ‘एमएच ०२ पी ४३’ हा नंबर तयार केलेला.
च्त्याआधारे मुंबई आरटीओकडे त्यांनी चौकशी केली असता ‘एमएच ०२ पी ४३११’ या संशयित कारचालकाचा बोरिवली येथील पत्ता पोलिसांना मिळाला. तेथे जाऊन चौकशी केली असता कारमालकांनी राहण्याचे ठिकाण बदलले असल्याचे समोर आले. अखेर त्याच परिसरात चौकशी करून त्यांचे सीवूड येथील राहण्याचे नवे ठिकाण पोलिसांनी शोधून काढले. त्यानुसार डॉ. पद्मा प्रिया यांना अटक केल्याचे संगीता शिंदे यांनी सांगितले.