कोंडीमुळे जयंतराव पर्यायांच्या शोधात
By admin | Published: December 9, 2014 11:45 PM2014-12-09T23:45:56+5:302014-12-09T23:53:24+5:30
वादळापूर्वीची शांतता : कार्यकर्त्यांत अस्वस्थता; अस्तित्व टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न
अशोक पाटील -इस्लामपूर -पंधरा वर्षांनंतर मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे वनजदार नेते आमदार जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. जयंतराव वरवर शांत दिसत असले तरी, अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी केल्याची चर्चा एकीकडे आहे, तर दुसरीकडे याच पक्षात राहून स्वत:च्या गटाची मजबूत बांधणी करण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे बोलले जात आहे.
सध्या जयंत पाटील यांनी आफ्रिकेत भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्याने ते राजकीय कोंडीत सापडले आहेत. कारण जिल्हा बँकेतील गैरव्यवहारासारखे जिल्ह्यातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागले असून, त्या प्रश्नांवर विधानसभेत त्यांना सामोरे जावे लागणार आहे. पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात इस्लामपूर व परिसरात कार्यकर्त्यांना गारमेंट उद्योग उभे करण्यास पाठबळ दिले, परंतु हा उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे.
पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या पेठनाक्यावरील खासगी प्रकल्पात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तेथील कामगारांचे प्रश्न जटिल बनू लागले आहेत. तेथे मतदारसंघातील हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले होते, परंतु पगाराच्या प्रश्नावरून त्यातील अनेकांनी काम बंद केले आहे. परिणामी मजुरांची संख्या रोडावल्याने हा उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राजारामबापू उद्योग समूहातील राजारामबापू बँक, दूध संघ आणि शिक्षण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्था चालविण्यासाठी पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंत्रीपद असताना त्यांनी या संस्थांसाठी विविध योजनांतून निधी मिळवला होता. आता मंत्रीपद नसल्याने संस्था चालविणे आव्हान ठरणार आहे. याच गोष्टींचा विचार केला तर आगामी काळात राजकीय धोरणांमध्ये त्यांनी आश्चर्यकारक बदल केले तर आश्चर्य वाटणार नाही.
जयंत पाटील गेले काही दिवस परदेश दौऱ्यावर होते. सध्या ते हिवाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यानंतर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून संस्थात्मक बांधणीसह राष्ट्रवादीला भक्कम करणे अथवा इतर निर्णय घेणे याबद्दल बैठक निश्चित करण्यात आली आहे.
- बी. के. पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.
राजकीय भूकंप होण्याची चिन्हे...
इस्लामपूर व आष्टा शहरांतील विकासाच्या योजना प्रलंबित आहेत. यासाठी विविध योजनांतून निधी मिळविण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न राहतील, परंतु मंत्रीपद नसल्याने त्यात अडथळेही येणार आहेत. या संकटांना तोंड देण्यासाठी सध्या पाटील यांनी शांत राहणे पसंत केले आहे. मात्र पाटील यांची कारकीर्द पाहता, ही वादळापूर्वीची शांतता असून, भविष्यात राजकीय भूकंप करून धक्का देण्याची तयारी त्यांनी चालवली असल्याचे संकेत मिळत आहेत.